लोणावळा : लोणावळा शहरात खंडणी, हाणामारी, अवैध धंदे अशा पद्धतीने धुमाकूळ घालत असलेल्या लादेन टोळीच्या मुसक्या आवळण्याची तयारी लोणावळा शहर पोलिसांनी सुरू केली़ त्यादृष्टीने पुरावे गोळा करत कलम ५५ प्रमाणे तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याचे लोणावळा शहर पोलिसांनी सांगितले.लोणावळा शहरात २०१५ साली भरदिवसा जयचंद चौकात ‘लादेन’ टोळीतील गुंडांनी धारदार चाकूने वार करून आनंद शिंगाडे या युवकाची हत्या केली होती. जेलमधून बाहेर सुटलेले आरोपी हे गप्प बसणार नाहीत, याबद्दल पोलिसांना खात्री होती, त्यामुळे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी या टोळीतील गुन्हेगाराची दहशत मोडून काढण्यासाठी त्याचे विरुद्धचे सर्व पुरावे गोळा करून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे प्रस्ताव तयार केला. मात्र, या प्रस्तावासाठी नागरिकांचेदेखील गोपनीय जबाब लागतात यासाठी जाधव यांनी लोणावळा शहरातील व्यापारी, सामाजिक कार्य करणारे लोक यांना पुढे होऊन जबाब देण्यासाठी आवाहन केले. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.मागील आठवडाभरात या टोळीने शिवसेनेच्या नगरसेविका शादान चौधरी, उद्योजक प्रकाश हजारे यांच्यासह अन्य दोन व्यावसायिकांकडे खंडणीची मागणी करत त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. याप्रकरणी चौधरी व हजारे यांच्या तक्रारीवरून लादेन टोळीवर खंडणीचे दोन गुन्हे दाखल करत दोन जणांना अटक करण्यात आली असून, याप्रकरणातील मुख्य तीन जण अद्याप फरार आहेत.
लोणावळा : 'लादेन' टोळीच्या तडीपारीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 6:19 AM