पुणे : ‘आधार कार्ड’ नोंदणीचा गोंधळ अद्यापही कायम असून बाजीराव रस्त्यावरील वर्धमान हाईट्स इमारतीमधील आधार नोंदणी कार्यालयात सोमवारी पहाटेपासूनच शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. एकीकडे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी १८५ केंद्रांवर आधार नोंदणी सुरू असल्याचा दावा केला आहे. परंतु, प्रत्यक्षात पुणे आणि पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यामध्ये केवळ ११० केंद्र सुरू असल्याची माहिती समोर आल्याने हा दावा फोल ठरला आहे.मागील सहा महिन्यांपासून आधारचा गोंधळ सुरू आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आधार बंधनकारक करण्यात आलेले आहे. यासोबतच पॅनकार्ड, मोबाईल सिमकार्ड, बँक खाते, प्राप्तिकर विवरण, रुग्णालयांमध्येही आधार जोडणी आवश्यक करण्यात आलेली असल्याने नागरिकांनी धावपळ सुरू आहे. नवीन आधार काढण्यासोबतच त्यामधील दुरुस्तीसाठी नागरिकांना आधारची केंद्रे शोधत फिरावे लागत आहे. शासनाचे फुसके आदेश, महाआॅनलाइन आणि खासगी संस्थांमधील टक्केवारीचा वाद, तांत्रिक अडचणी यामुळे आधार केंद्रे व्यवस्थित सुरू होऊ शकलेली नाहीत.यावर तोडगा काढण्यासाठी नादुरुस्त असलेल्या शंभर मशीन्स दुरुस्त करण्याची परवानगी मिळावी आणि खासगी एजन्सीजना शासकीय कार्यालयांमध्ये परवानगी मिळावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिला होता. मात्र, हा प्रस्ताव अद्यापही बासनातच गुंडाळलेला आहे. सोमवारी बाजीराव रस्त्यावरील वर्धमान हाईट्स इमारतीमधील अलंकित लिमिटेड, शुक्र वार पेठेतील एनएसडीएल ई-गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या आधार केंद्रांवर पहाटे चार वाजल्यापासूनच रांगा लागल्या होत्या. थंडीच्या कडाक्यात लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण आधारसाठी उभे होते. अलंकित लिमिटेडच्या कार्यालयात नागरिकांना टोकन दिले जाते. हे टोकन मिळविण्यासाठी नागरिकांची झुंबड उडालेली होती. गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.प्रत्येक सोमवारी आधार नोंदणी आणि दुरुस्तीसाठी नागरिकांना टोकन दिले जाते. त्यामुळे दर सोमवारी गर्दी होत असते. मात्र, या वेळी पहिल्यांदाच एवढी गर्दी झाली. आम्ही कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही. एका आठवड्यासाठी दर दिवसाला सत्तर याप्रमाणे टोकन देण्यात आले आहेत.- श्री पंकज, आधार केंद्र चालक,अलंकित लिमिटेडआधारची केंद्रच झाली निराधार१ केंद्र व राज्य सरकारनेही प्रत्येक योजनेसाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहे. मात्र ते कार्ड देण्यासाठी जी व्यवस्था करण्यात आली आहे ती आधार केंद्रच निराधार झालेली आहेत. तेथील कामकाज सक्षमतेने सुरू नाही. या केंद्राची संख्या वाढवावी व तक्रारी असलेल्या केंद्रातील कर्मचाºयांची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेने महापालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत केली.२ राष्ट्रवादी काँग्रेसनेही याबाबत टीका केली. महापालिका आधारकार्ड काढून देण्याच्या बाबतीत ढिम्म आहे, असा आरोप शिवसेनेच्या विशाल धनवडे यांनी केला. शहराच्या मध्य भागात सुरू केलेल्या केंद्रांवर नागरिकांकडून जास्त पैसे घेतले जातात, असा आरोप त्यांनी केला.३ राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप बराटे यांनी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आधार कार्ड काढून देणारी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी केली. आधारकार्ड काढण्यासाठी केंद्रावर आलेल्या वृद्धांच्या बोटांचे ठसे आणि डोळे स्कॅन होत नाहीत. त्यामुळे वृद्ध मंडळींना तासन्तास रांगेत उभे राहून मोकळ्या हाताने परतावे लागते.४ सुरू करण्यात आलेल्या आधार कार्ड केंद्रावरील अनेक उपकरणे बंद आहेत. तिथे कर्मचारी नाहीत. त्यामुळे नागरिकांना रांगा लावून थांबावे लागते, असे काही नगरसेवकांनी सांगितले. प्रशासनाच्या वतीने केंद्रांची संख्या वाढवण्यात येईल, असे या वेळी सांगण्यात आले.
‘आधार’साठी लागल्या लांबच लांब रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 4:47 AM