पुणे शहरातील लसीचा उपलब्धतेचा गोंधळ अजून ही सुरूच आहे. मागणी असून देखील आजही पुणे महापालिकेने पुरेशा लसी दिल्या नसल्याचा आरोप खाजगी रुग्णालयांनी केला आहे. तर महापालिकेचा अधिकाऱ्यांचा मते ते रुग्णालयातील लसीची उपलब्धता तसेच त्या रुग्णालयात होणारे लसीकरण याचा आढावा घेऊनच लस वाटप केला जात असल्याचे म्हणाले आहे. दरम्यान एकूण लसींचा उपलब्धतेचा प्रश्न अजूनही कायम असल्याने ४५ वर्षांचा पुढचा लोकांचे सरसकट लसीकरण कसे करणार हा प्रश्न अजूनही विचारला जात आहे.
पुणे महापालिकेचा नारायण पेठेतील मावळे दवाख्यानात सकाळीच नागरिकांची गर्दी झालेली असते. यात तळमजल्यावर असतात ते लसीकरण करायला आलेले नागरिक , तर वरचा मजल्यावर असतात ते लस घेण्यासाठी आलेले रुग्णालयांचे प्रतिनिधी. लसीकरणासाठी रांग लागणे तर नेहमीचेच. पण इथे लस घेण्यासाठी देखील रुग्णालयांचा प्रतिनिधींना रांग लावून उभे राहावे लागत आहे.
अशाच एका प्रतिनिधीने लोकमतशी बोलताना सांगितले, " मी सकाळी ९ वाजता इथे आलो आहे. मला क्रमांक मिळाला आहे तो २० चा पुढचा साधारण दीड तास थांबल्यावर देखील अजून मला लसीचा साठा मिळायचा आहे. त्यातच ते किती लसी देतील याची काहीच शास्वती नाही.सकाळ पासून प्रत्येक रुग्णालयाला १० ते १५ व्हायल्सच पुरवल्या जात आहेत."
आणखी एका प्रतिनिधींनुसार " आम्ही जवळपास दररोज इथे येत आहोत. पण आम्हाला कधीच पुरेसा साठा दिला जात नाहीये.जास्त लसीकरण करण्याची क्षमता असताना देखील महापालिका लस देत नसल्यामुळे फेऱ्या मारण्याची वेळ आमच्यावर आली आहे. "
दरम्यान महापालिकेचा आकडेवारी नुसार काल महापालिकेला ५५००० लसी मिळाल्या आहेत. यामध्ये सगळ्या लसी या कोव्हीशील्ड चा देण्यात आल्या आहेत . काहीच दिवसांपूर्वी कोव्हीशील्ड उपलब्ध नसल्यामुळे कोवॅक्सिन चा साठा पुणे महापालिकेला देण्यात आला होता. एकूण ११० केंद्र आणि उपलब्ध साठा याचे नियोजन करणे ही तारेवरची कसरत महापालिकेचा अधिकाऱ्यांना करावी लागत आहे . त्यातच जर ४५ चा वरचा लोकांचे सरसकट लसीकरण करायचे असेल तर ते नियोजन कसे करणार असाही प्रश्न त्यांना पडला आहे. कमी लस का दिली जात आहे याबाबत विचारले असता महापालिकेचा लसीकरण विभागाचे प्रमुख डॉक्टर अमित शहा म्हणाले , " प्रत्येक रुग्णालयाचे नियोजन कसे आहे ? त्यांचा कडे शिल्लक साठा किती आहे आणि किती लोकांचे लसीकरण त्यांच्याकडून केले जात आहे या सर्व बाबींचा आढावा घेऊन आम्ही किती लस द्यायची याचे नियोजन करत असतो. हे करताना कोणत्याही रुग्णालयाला कोणालाही परत पाठवावे लागणार नाही याचीही काळजी आम्ही घेत आहोत. ज्याप्रमाणे साठा उपलब्ध आहे त्यानुसार हे नियोजन सुरु आहे. राज्य सरकार चे आदेश आले कि त्यानंतर ४५ वर्षांचा वरचा सर्व लोकांचे सरसकट लसीकरण करण्याचे देखील नियोजन केले जाईल."