लोकमत न्यूज नेटवर्कसांगवी : ‘‘आगामी येणाऱ्या दहीहंडी, गणेशोत्सव व लोकांच्या वर्दळीच्या सणामध्ये कोणत्याही प्रकाराचे कायद्याचे उल्लंघन होणार नाही. यासाठी बारामती तालुक्यात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. त्या त्या विभागात शांतता अबाधित राहावी, यासाठी जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर दीर्घकालीन प्रतिबंधक कारवाई करण्याचे आयोजन केले आहे. तसेच नमूद कालावधीत सर्व प्रशासकीय स्तरावर एकत्रित म्हणून महसूल खाते, पोलीस खाते, स्थानिक स्वराज्य संस्था या काम पाहणार आहेत,’’ अशी माहिती बारामती तालुका ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुरेशसिंह गौड यांनी सांगितले. यामध्ये प्रशासकीय टीम, पोलीसमित्र, प्रतिष्ठित व्यक्तीयांची यामध्ये मदत घेणार आहोत. आपल्या रुढी, परंपरा, समाजविकास, वेगवेगळ्या क्षेत्रात कायदेशीररीत्या काम करणाऱ्या संस्थांना पोषक वातावरण राहील, याबद्दल अनुकूल परिस्थिती निर्माण करणार आहेत. तसेच या सणांमध्ये असभ्य वर्तन करणाऱ्यांवर वेळीच कारवाई करण्यासाठी पथक नेमण्यात येणार आहे. आवश्यक तिथे महत्त्वाच्या ठिकाणी अचानकपणे नाकाबंदी करून सर्च आॅपरेशन करण्यात येत आहे. यामुळे गुन्हेगारीला व इतर गैरप्रकाराला आळा बसेल. यामुळे कोणताही समाजकंटक समाजात लपून राहू शकणार नाही. बारामती तालुका पोलीस ठाणे आतापर्यंत २ व्यक्तींना तडीपार केले आहे. संपूर्ण पोलीस यंत्रणा सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवून आहे. या काळात कोणी गैरवर्तन करणारा आढळून आल्यास त्याची गय न करता कायदेशीर शिक्षा दिली जाईल, असा कडक इशारा गौड यांनी दिला आहे. दहीहंडी, गणेशोत्सवकाळात प्रत्येक गावात, सरपंच, बीट अंमलदार पोलीस, पोलीसपाटील, ग्रामसेवक, पोलीसमित्र, प्रतिष्ठित व्यक्ती, ग्राम सुरक्षा दल अशा सात व्यक्तींचा एक विशिष्ट गट नेमण्यात येणार आहे. या काळात या सर्व व्यक्ती एकत्रित येऊन कार्यक्रमाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही, याची दक्षता घेणार आहेत. यासाठी लोकांनीही सतर्क राहून या गटाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था विस्कळीत होणार नाही, असा विश्वास गौड यांनी व्यक्त केला. पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अपर पोलीस उपअधीक्षक संदीप पखाले, उपविभागीय अधिकारी बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत नियोजन करण्यात आले आहे, असे गौड म्हणाले.
गुन्हेगारांवर दीर्घकालीन प्रतिबंधात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 2:30 AM