लोणी भापकर : लोणी भापकर (ता. बारामती) येथील यात्रेत महिलांना मारहाण करून दहशत माजविणाऱ्या गावगुंडांना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी गुरुवारी (दि. १६) येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. दोन दिवसांत आरोपींना अटक न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय यावेळी बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, गावातील कायदा व सुव्यवस्था वेठीस धरणाऱ्यांना तातडीने अटक करण्याची ग्वाही वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सतिश शिंदे यांनी दिल्यानंतर जमाव शांत झाला.लोणी भापकर येथील ग्रामदैवताची ४ दिवसांची यात्रा शांततेत सुरु होती. मात्र, यात्रेच्या शेवटच्या दिवशी हाणामारीचे गालबोट लागले. बुधवारी (दि. १५) येथील लालासाहेब विश्वास जगदाळे हे त्यांच्या कुटुंबासमवेत देवदर्शनासाठी भैरवनाथ मंदिरात आले होते. त्याचवेळी चौकात काही जण महिलांना त्रास देत असल्याचे पाहून जगदाळे यांनी टोळक्याला जाब विचारला असता, त्यांच्यासह महिलांनाही गावगुंडांनी मारहाण केल्याची तक्रार जगदाळे यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. महिला व शालेय विद्यार्थीनींना त्रास देण्याचे प्रकार यापूर्वीही गावात घडले आहेत. त्यामुळे गुरुवारी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत निषेध सभा घेतली व गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. संबंधित गावगुंडांना तातडीने अटक करावी या मागणीसाठी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून मुकमोर्चा काढण्यात आला. यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या सभेत पोलीस प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्तकरण्यात आली.यानंतर ग्रामस्थांनी लोणी पाटी येथे एकत्र येत बारामती-मोरगाव रस्त्यावर ठिय्या दिला. यावेळी युवक क्रांती दलाचे प्रा. रविंद्र टकले यांनी ग्रामस्थ व पोलीस उपनिरीक्षक यांच्याशी चर्चा करून जमाव शांत केला. त्यानंतर दुसरी बैठक घेण्यात आली. यावेळी शेतकरी कृती समितीचे नेते सतिश काकडे यांनी आरोपींना पकडण्यासाठी पोलीस प्रशासनाला अवधी देण्याचे व शांतता पाळण्याचे आवाहन केले. पोलीस निरीक्षक शिंदे यांनीही आरोपींना दोन दिवसांत अटक करण्याची ग्वाही दिली. (वार्ताहर)दारुविक्री बंद होणार का ?गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्यास मुख्यत: दारु कारणीभूत असल्याने गावात संपूर्ण दारुबंदी करण्याची मागणी यावेळी एकमुखी करण्यात आली. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिंदे यांनी आठ दिवसांत लोणी भापकरसह परिसरातील दारुविक्री बंद करण्याची घोषणा केली.
लोणी भापकरला महिलांना गावगुंडांकडून मारहाण
By admin | Published: April 16, 2015 11:03 PM