लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेला व खून, खुनाचा प्रयत्न अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एकूण ११ गुन्हे दाखल असलेल्या अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आले आहे.
शुभम कैलास कामठे (वय २६, रा. कदमवस्ती, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) असे या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. १७ फेब्रुवारी रोजी शुभम कामठे व त्याच्या साथीदारांनी रोहन इंगळे याच्यावर धारदार कोयत्याने हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न कामठे याने केला होता. या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम कामठे हा तेव्हापासून फरार होता. पोलीस त्याचा शोधात होते. शुभम हा रविवारी (दि.२३) सोरतापवाडी हद्दीत येणार असल्याची माहिती गुन्हे शोध पथकातील अमित साळुंखे व निखिल पवार यांना मिळाली. त्यांनी राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली सोरतापवाडी येथे सापळा रचला होता. शुभम कामठे हा तेथे आला असता त्याला पोलिसांची चाहूल लागली. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीस पथकाने पाठलाग करून त्याला अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व दोन काडतूस जप्त करण्यात आली आहेत. या संदर्भात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फोटो : जप्त केले पिस्तूल आणि काडतुसे