> लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या लोणी काळभोर ( ता. हवेली ) ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये परिवर्तन पॅनेलने १३ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला असून अष्टविनायक पॅनेलला ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
१५ जानेवारी रोजी २०२१ - २०२६ या कालावधीसाठी कार्यकारी मंडळ निवडण्यासाठी मतदान झाले होते. मतदानापूर्वी प्रचार सुरु असताना दोन प्रतिस्पर्धी गटात जोरदार हाणामारी झाली होती. यासंदर्भात लोणी काळभोर पोलिसांनी दोन्ही गटांतील एकूण २४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मतदानाच्या दिवशी ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यामुळे आजच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पोलीस निरीक्षक सूरज बंडगर व त्यांच्या सहका-यांनी चोख बंदोबस्त तैनात करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते.
थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष, जेष्ठ नेते माधव काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, महाराष्ट्र केसरी पै. राहुल काळभोर, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शिवदास काळभोर यांचे परिवर्तन पॅनेल व शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, माजी सरपंच शरद काळभोर यांचे अष्टविनायक पॅनेल अशी लढत झाली होती. शेखर काळभोर यांनी संघर्ष विकास आघाडी करुन एका प्रभागामध्ये दोन जागा लढवल्या होत्या. परिवर्तन व अष्टविनायक पॅनेल यांनी प्रत्येकी सतरा ठिकाणी उमेदवार उभे केले होते. परिवर्तन पॅनेलला १३ जागा, अष्टविनायक पॅनेलला ४ जागा मिळाल्या तर संघर्ष विकास आघाडीला एकही जागा मिळाली नाही.
लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाची चव चाखावी लागली. तीन वेळा ग्रामपंचायत सदस्य असलेले माजी उपसरपंच अण्णासाहेब काळभोर, ४ वेळा ग्रामपंचायत सदस्य असलेले विजय ननवरे, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काळभोर, नलिनी काळभोर, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख रमेश भोसले यांना आपापल्या प्रभागात पराभव स्वीकारावा लागला.
लोणी काळभोर ग्रामपंचायत निवडणुकीमधील सहा प्रभागातील विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे-प्रभाग क्रमांक १ -
राजाराम विठ्ठल काळभोर - १३९०
प्रियांका सचिन काळभोर - १४६३ सविता गिताराम लांडगे - १४३४ ( तिघेही परिवर्तन पॅनेल ) प्रभाग क्रमांक २ -
ललिता राजाराम काळभोर - ११४९ ( परिवर्तन पॅनेल )
सुनिल बाबुराव गायकवाड - ११२६ सविता नितीन जगताप - ९३३ ( दोघेही अष्टविनायक पॅनेल )
>प्रभाग क्रमांक ३ -
माधुरी राजेंद्र काळभोर - ८५२ ( परिवर्तन )
राहुल दत्तात्रय काळभोर - ७३२ ( अष्टविनायक ) प्रभाग क्रमांक ४ -
योगेश प्रल्हाद काळभोर - १३१३
भारती राजाराम काळभोर - १०९६
गणेश तात्याराम कांबळे - १०४८ ( तिघेही परिवर्तन पॅनेल )
प्रभाग क्रमांक ५ -
भरत दत्तात्रय काळभोर - १४६२ रत्नाबाई राजाराम वाळके - १४१२
ज्योती अमित काळभोर - १४१९ ( तिघेही परिवर्तन पॅनेल )
प्रभाग क्रमांक ६ -
नागेश अंकुश काळभोर - १२७४
संगीता सखाराम काळभोर - १००३ ( दोघेही परिवर्तन पॅनेल )
बकुळा पांडुरंग केसकर - १३५८ ( अष्टविनायक पॅनेल )
परिवर्तन पॅनेल निवडून आल्यानंतर माधव काळभोर व त्यांचे सहकारी.