लोणी काळभोर : मैलापाण्याच्या टाकीमध्ये उतरण्यास भाग पाडून चौघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत संबंधित घरमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली. दुसरीकडे कामगारांना वर काढण्यासाठी एकास जबरदस्तीने टाकीमध्ये उतरविल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला.
भीमाजी जयसिंग काळभोर (वय ३७, रा. सिद्राममळा लोणी काळभोर) असे अटक केलेल्या घरमालकाचे नाव आहे. या प्रकरणी राजनंदिनी पद्माकर वाघमारे (वय २६, सध्या राहणार जयमल्हार बिल्डींग,प्यासा हॉटेलमागे कदमवाकवस्ती, मूळगांव वडगांव शिराढोण, जि.उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे.
कदमवाकवस्ती येथे सेफ्टीटॅंक सफाई करण्यासाठी टॅंकमध्ये उतरलेल्या रुपचंद नवनाथ कांबळे, (वय ४५, सध्या रा. घोरपडेवस्ती, कदमवाकवस्ती, मूळ केळेवाडी, जि.उस्मानाबाद), सिकंदर पोपट कसबे (वय ४५, रा. पाण्याचेटाकीजवळ, संभाजीनगर, कदमवाकवस्ती), पद्माकर मारुती वाघमारे (वय ४२), कृष्णा दत्ता जाधव (वय २५, रा. देशमुखवस्ती, देगाव, ता. उत्तर सोलापूर) या चौघांचा काल मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला.
याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, या प्रकरणातील मृत्यू पावलेले पद्माकर वाघमारे हे एमआयटी कॉलेज येथे सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करत होते. पद्माकर हे रात्रपाळी ड्युटी संपवून २ मार्च रोजी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास घरी आले. त्यानंतर आंघोळ व जेवण करून झोपले होते. त्यावेळी सव्वादहाच्या सुमारास भीमाजी काळभोर तेथे आले. त्यांनी वाघमारे यांना आवाज दिला होता. तेव्हा ते झोपले आहेत. त्यांना उठवू नका असे राजनंदिनी यांनी सांगितले. त्यामुळे ते निघून गेले.
त्यानंतर राजनंदिनी या मुलाला शाळेत सोडण्यासाठी घराला बाहेरून कडी लावून गेल्या. पावणेअकराच्या सुमारास त्या परत आल्या त्यावेळी इमारतीमध्ये खूप लोक जमलेले होते. त्यांना सेफ्टीटँकमध्ये कामगार पडल्याचे तसेच घरमालकाने पतीस झोपेतून उठवून कामगारांना काढण्यासाठी जबरदस्तीने टाकीमध्ये उतरविल्याचे त्यांना समजले. उपस्थितांपैकी अमर भोसले यांनी जीव धोक्यात घालून खाली उतरून पद्माकर यांना बेशुद्धावस्थेत वर काढले. त्यांना विश्वराज हॉस्पिटल लोणीस्टेशन येथे नेले. तेथे डॉक्टरांनी तपासून ते मृत झाल्याचे सांगितले. वाघमारे यांच्यासह अन्य तिघांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप करून काळभोर याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपरीक्षक भागवत शेंडगे करत आहेत.