याप्रकरणी महादेव पोपट पांगारकर (वय २६, रा. पांगारकरवस्ती, सहजपूर, ता. दौंड ) व त्याचा मित्र राहुल सुरेश भिलारे (रा. जावजीबुवाची वाडी, ता. दौंड) यांना अटक करण्यात आली आहे. लोणीकाळभोर पोलीस ठाण्याचे तपास पथक हद्दीत गस्त घालत असताना त्यांना बातमीदारामार्फत तपास पथकातील पोलीस हवालदार शैलेश कुदळे व बाजीराव वीर यांना महादेव पांगारकर हा चोरीची ॲक्टिव्हा मोटार सायकल घेऊन लोणी काळभोर गावच्या हद्दीत फिरत आहे अशी माहिती मिळाली. सदर बाब पथकप्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांनी मोकाशी यांना कळवून त्यांच्या आदेशाप्रमाणे मिळालेल्या बातमीनुसार पांगारकर यांस शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतले असता त्याने त्याच्याकडील मोटारसायकल ही उरुळी देवाची (ता. हवेली) येथून चोरी केल्याचे सांगितले. त्यास
अटक करून सखोल तपास केला असता पांगारकर याने त्याचा मित्र राहुल भिलारे याचे मदतीने पिंपरी-चिंचवड, चिखली, वाकड, भिगवन, खेड, लोणी काळभोर परिसरातून दुुचाकी चोरल्याचे सांगितले. भिलारे यालाही सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
त्यांचेकडून २ लाख २० हजार रुपये किमतीच्या ७ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांच्याकडून पुणे शहर, पिंपरी - चिंचवड तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यातील लोणीकाळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीतील २ तर खेड, भिगवन, चंदननगर, वाकड, चिखली पोलीस ठाण्याचे हद्दीतील प्रत्येकी १ गुन्हा उघडकीस आला आहे.
तसेच महादेव पांगारकर व राहुल भिलारे हे सध्या यवत पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात हवे असलेले आरोपी आहेत. सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त,पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, अमित साळुके, श्रीनाथ जाधव, सुनील नागलोत, अक्षय कटके, प्रशांत सुतार, शैलेश कुदळे, बाजीराव वीर, निखिल पवार, दिगंबर सालुंके यांनी केली आहे.