पुणे : ब्रिटनमधून पुणे शहरात व परिसरात १ डिसेंबरपासून आजपर्यंत ५४४ प्रवासी आले असून, यापैकी १३ डिसेंबरला पुण्यात आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने त्याला ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आलेले आहे़
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे नवे स्वरूप आढळून आल्यावर त्याचा लागलीच मोठ्या प्रमाणात संसर्गही सुरू झाला. या पार्श्वभूमीवर देशात ब्रिटनवरून येणाऱ्या सर्व विमानसेवा बंद करण्यात आल्या आहेत़ राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे १ डिसेंबर पासून ब्रिटनवरून आलेल्या तसेच इतर सर्व देशातून आलेल्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे़ याचबरोबर विमानतळावरच त्यांची तपासणी करण्यात येत असून, पुणे शहरात आखाती देशातून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळाच्या परिसरातील हॉटेलमध्ये १४ दिवसांकरिता क्वारंटाईन करण्यात येत आहे़
महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १ डिसेंबरपासून ब्रिटनहून मुंबईत व तेथून पुणे आणि परिसरात वाहनाने ५४४ प्रवासी आलेले आहेत़ या सर्वांचे निवासी पत्ते व मोबाईल क्रमांक महापालिकेकडे असून, आरोग्य विभागामार्फत या प्रवाशांच्या घरी जाऊन त्यांचे कोरोना चाचणीचे पूर्वीचे अहवाल तपासून खात्री केली जाणार आहे़ तसेच पुन्हा त्यांची कोरोनाविषयक तपासणी करून त्यांना ताप, सर्दी व संबंधित लक्षणे आहेत का याची पाहणी केली जाणार आहे़ यात लक्षणे असलेल्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करणे अथवा नायडू रूग्णालयात लागलीच दाखल करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे़
शहरात आलेल्या ५४४ प्रवाशांपैकी १३ डिसेंबर रोजी आलेला एक प्रवासी पॉझिटिव्ह असून, त्याला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़ तर जे प्रवासी मुंबईहून (ब्रिटनहून आलेले) वाहनांनी पुण्यात आले आहेत, त्यांची पूर्वीच आरटीपीसीआर (कोरोना चाचणी) करण्यात आली आहे़ हे सर्व प्रवासी कोरोनामुक्त (कोरोना चाचणी निगेटिव्ह) असल्याची नोंद आहे़
चौकट
..तर लगेच ‘अँडमिट’ करणार
“ब्रिटनहून आलेल्या पुणे शहरातील प्रवाशांची यादी आरोग्य विभागाला गुुरुवारी (दि. २४) मिळाली. या सर्वांचे पत्ते व मोबाईल क्रमांक हे प्रत्येक वॉर्ड ऑफिसच्या ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग टिम’कडे पाठविण्यात आले आहे़ त्यांच्या मार्फत या प्रवाशांची तपासणी करण्यात येणार असून, कोरोना विषयक लक्षणे असलेल्यांना लागलीच नायडू रूग्णालयात दाखल करण्यात येणार आहे़ ”
-डॉ़ वैशाली जाधव, सहाय्यक आरोग्य प्रमुख पुणे महापालिका़