राजेगाव : दौंड तालुक्याच्या पूर्व भागात अद्यापही पाऊसच न पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. मात्र पुणे परिसरातील धरणक्षेत्रांत गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडला असल्याने उजनी धरणाची शंभर टक्क्यांकडे वाटचाल चालू असल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.त्यामुळे धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.
धरणाची शंभर टक्क्यांकडे वाटचाल : पाऊस नसल्याने उसाला पर्यायी पिके घेतली
जिल्ह्याच्या पश्चिम भागाला गेल्या आठवड्यात पावसाने झोडपून काढले असले, तरी पूर्व भागातील तालुके अजूनही कोरडेच आहेत. दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी अजूनही दमदार पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. खानवटे, राजेगाव, नायगाव, वाटलूज , मलठण, हिंगणी बेर्डी, शिरापूर इत्यादी गावांना उजनी धरणाचे बॅकवॉटर म्हणजे या भागाला मिळालेले वरदान आहे. या पाण्यावरच हा भाग सुजलाम्-सुफलाम् झाला आहे. दरम्यान, त्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. नदीकाठच्या गावांतील नागरिक दुथडी भरून वाहणाºया भीमा नदीचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी नदीकिनारी गर्दी करीत आहेत. या परिसरात दर वर्षी साधारणच पाऊस होत असला, तरी पुणे परिसरातील धरणसाखळीत भरपूर पाऊस पडून उजनी धरण भरण्याची वाट या भागातील शेतकरी पाहत असतात.
दरम्यान, आॅगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा आला, तरी या भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने या परिसरातील विहिरी, कूपनलिका हे पाण्याचे स्रोत अद्यापही कोरडेच आहेत. त्यामुळे पुरेशा पाण्याअभावी परिसरात उसाच्या लागवडीच्या प्रमाणात खूप घट झाली आहे. उसाला पर्याय म्हणून यंदा मका, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या पिकांकडे शेतकरी वळलेला दिसून येत आहे. जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या थोड्याफार पावसाच्या ओलीवर या पिकांच्या पेरण्या केल्या. परंतु, त्यानंतर समाधानकारक पाऊस न झाल्याने पिके सुकून चालली आहेत. गेले तीन-चार दिवस या भागात आकाशात काळे ढग दाटून येत आहेत; परंतु फक्त भुरभुर आणि एखादीदुसरी हलकी पावसाची सर येत असल्याने शेतकरी शेतात करीत असलेल्या कामाचा खोळंबा होत असल्याचे सर्वसाधारण चित्र आहे. त्यामुळे दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील बळीराजा वरुणराजाची चातकासारखी प्रतीक्षा करीत आहे.