पुणे : पुणेकरांचा स्वभाव आणि त्यांच्या सवयी यावरून त्यांची वेगळीच ओळख आहे. त्यात दुपारी १ ते ४ या वेळेत वामकुशी घेण्याची बऱ्याच पुणेकरांच्या सवयीचा भाग आहे. त्यावरून बरीच टीका टिपण्णी देखील होत असते. पण आता याच कार्यपद्धतीवर बोट ठेवत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी ''पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बघा ते दिवसभरातले अक्षरश: २२- २२ तास काम करतात'' अशा शब्दात पुणेकरांवर 'उपदेशात्मक निशाणा' साधला आहे.
पिंपळे सौदागर येथे भाजपा आमदारांचा कौतुक सोहळा शनिवारी (दि.२४ ) पार पडला.या कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांनी उपस्थित भाजपा आमदार-कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला भाजपाचे दीडशेहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
पाटील म्हणाले, पंतप्रधानांकडून अनेक गोष्टी शिकण्यासारखे आहे. ते विरोधकांकडून होणाऱ्या टीकेची कदापि चिंता करत नाही व त्याला प्रत्युत्तर सुद्धा देत बसत नाही. मोदी कधीही टीकेने विचलित होत नाही. ते फक्त प्रामाणिकपणे आपले काम करत राहतात. त्यांच्यावर झालेल्या कितीही टोकाच्या टीकेला ते संयमाने सामोरे जातात.कितीतरी वर्षांनी देशाला आणि जगाला असे व्यक्तिमत्व मिळाले आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून सुद्धा काही जणांनी टीका केली होती. परंतु मोदींनी त्यावर कोणतेही आक्रमकपणे भाष्य न करता प्रत्यक्ष उपस्थित राहत तो भूमिपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला.
पाटील यांनी सांगितले, निवडणुकीत जनतेने तुम्हाला दिलेला विजय हा त्यांचे कामे, प्रश्न मार्गी लावण्यासाठी आहे. त्या उद्देशाला व त्यांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देता कामा नये. अन्यथा पाच- सहा वेळेस आमदारकी पदरी पडून देखील काहीच उपयोग नाही. आयुष्यात नेहमी आपले लक्ष निश्चित करायला हवे . त्याचप्रमाणे सर्वानी आपल्याला रात्री झोपताना दिवसभरात कोणती चुकीची गोष्ट केली नाही ना हा प्रश्न विचारून याचे समाधानकारक उत्तरासाठी कायम प्रयत्नशील राहिले पाहिजे.
भाजपच्या 'या' कार्यक्रमात फिजिकल डिस्टनसचे वाजले तीन तेरा.. नेहमी शिस्तप्रियतेचे दर्शन घडविणाऱ्या भाजपाकडून या कार्यक्रमात पन्नासपेक्षा अधिक नागरिक एकत्र येणे, मास्क न परिधान करणे, फिजिकल डिस्टनसचे तीन तेरा वाजले होते. व्यापीठावरील काही नेते मास्कविनाच बसले होते. कोरोनाचे नेते आणि कार्यकर्ते यांना गांभीर्य नसल्याचे दिसून आले...................पोलीस आयुक्त कारवाई करणार?भाजपाच्या कार्यक्रमात फिजिकल डिस्टन्स, जमावबंदी, मास्क न वापरणे या कोरोना कालखंडातील नियमांचे उल्लंघन झाले आहे. नवनियुक्त डॅशिंग पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश भाजपावर कारवाई करणार का? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांतून उपस्थित होत आहे......................त्यांचे दणाणले धाबे दोन दिवसांपूर्वी झालेल्या दुष्काळ पाहणी दौºयात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह आल्याची बातमी कार्यक्रम सुरू असतानाच धडकली. त्यावेळी पाटील यांच्या संपर्कात अनेक कार्यकर्ते आणि नेते आले होते. त्यांचे धाबे दणाणले आहेत.