सोमेश्वरनगर / भोर : बारामतीतील सोमेश्वर व भोरमधील राजगड कारखाना निवडणूक प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावल्या. बुधवारी (दि. १५) या दोन्ही कारखान्यांसाठी मतदान होईल. माळेगाव कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर, ‘सोमेश्वर’च्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सोमेश्वर कारखाना निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ९ एप्रिलपासून परिसरात ठाण मांडून आहेत. त्यांनी सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जवळपास ९ ते १० प्रचारसभा घेतल्या. पवार यांच्यासह विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील हेदेखील त्यांच्या कार्यक्षेत्रातील सभासदांच्या गाठीभेटी घेत आहेत. विरोधक सभासदांची दिशाभूल करीत असल्याचे म्हणणे प्रामुख्याने प्रचार सभांमधून मांडण्यात आले़ शेतकरी कृती समितीनेदेखील राष्ट्रवादी काँग्रेससमोर आव्हान निर्माण केले आहे. शिवसेना, शेतकरी संघटना, शेतकरी कृती समवेत एकत्र आले आहेत. त्यांनीदेखील हा परिसर पिंजून काढला आहे. जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार राजू शेट्टी, चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांनी प्रचारात सहभाग घेतला आहे. सोमेश्वर कारखाना कर्जबाजारी केल्याच्या आरोपांभोवती विरोधकांनी संपूर्ण प्रचार फिरत ठेवला़ दोन्ही गटांकडून आक्रमकपणे आरोप-प्रत्यारोप करण्यात आले़ माळेगाव कारखाना निकालाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कृती समितीच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या निवडणुकीसाठी बुधवारी (दि. १५) मतदान होणार आहे. (वार्ताहर)४राजगड कारखाना निवडणूकीसाठी ७ जागा बिनविरोध झाल्या असून, निवडणूक लागलेल्या १० जागांसाठी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली राजगड सहकार पॅनेल १० जागा लढवत आहे, तर सर्वपक्षीय राजगड परिवर्तन पॅनेल ९ जागा लढवतेय. दोन्ही बाजूकडून प्रचार सभा, कोपरा सभा घेऊन आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात आल्या. ४याशिवाय, राष्ट्रवादीचे ६ उमेदवारी अर्ज राहिले असून, त्यातील वेल्हेतील तीन जणांनी सर्वपक्षीय पॅनेलचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. ४सर्वपक्षीय पॅनलने परिवर्तनाचा नारा दिला आहे, तर राजगड सहकार पॅनेलच्या ७ जागा बिनविरोध झाल्या असून, त्यांना कारखाना ताब्यात घेण्यासाठी दोनच जागांची गरज आहे. मात्र १० च्या १० जागा निवडून येतील असा त्यांना विश्वास आहे.
‘सोमेश्वर’कडे लक्ष
By admin | Published: April 13, 2015 11:00 PM