मी जेजुरी गावात राहत होते. चौथीमध्ये असतानाच हॅण्डबॉल या खेळाला सुरुवात केली. ते करीत जेजुरीमधील हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होते. त्या वेळी माझी मोठी बहीण कोमल वाघुले हीदेखील हॅण्डबॉल हा खेळ खेळत होती. इतकेच नव्हे, तर तिलाही शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्या वेळी मला राजेंद्र राऊत, राहुल चव्हाण, तानाजी देशमुख, रूपेश मोरे, राजेश गराडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी माझा सराव घेतला. त्यानंतर १०वीमध्ये पुण्यात आले. सराव सुरू असताना २००६ ते ०७ या कालावधीत माझी पहिली राष्ट्रीय स्पर्धा नाशिकमध्ये झाली. त्यामध्ये आमच्या संघाला दोनदा अपयश आले; परंतु तिथे न डगमगता मी सरावाला पुन्हा सुरुवात केली. दिवसामध्ये आम्ही तीन वेळा सराव करीत होतो. मग कोल्हापुरात नाशिकच्या संघासोबत आमची स्पर्धा झाली आणि तिथे आम्हाला यश मिळाले. त्यानंतर कोणत्याही स्पर्धेत कधीच आमच्या संघाला अपयश आले नाही. तेव्हापासून पुण्याचा संघ नेहमीच विजयी होत आला.सन २००७ ते २०१७पर्यंत मी ३५ आंतरराष्ट्रीय आणि असंख्य राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या आहेत. माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय स्पर्धा ठरली ती केरळमधील स्पर्धा. आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केरळमध्ये होते. तेव्हा आम्ही ती स्पर्धा खेळलो. दोन राऊंडपर्यंत ही स्पर्धा आम्हाला खूप कठीण गेली; परंतु जसे म्हणतात ना डर के आगेही जीत है, तसेच काही आमचे झाले. या स्पर्धेत संघाला तिसरी प्लेस मिळाली. तर, छत्तीसगडच्या संघासोबत स्पर्धेमध्येदेखील मला तिसरी प्लेस मिळाली. तसेच, अमरावतीत सिनिअर राष्ट्रीय स्पर्धा झाली त्यात पुणे संघ जिंकला. माझ्या आयुष्याला वळण देणारी कोल्हापूरची स्पर्धा ठरली; ज्यामुळे मला खूप काही शिकायला मिळाले. मला माझ्या खेळाचे महत्त्व समजले, तसेच खेळातील प्रत्येक सेकंदाचे महत्त्व पटले.मी हॅण्डबॉल खेळात आज १२ वर्षे खेळत आहे. त्यातून कामगिरीबद्दल मला छत्रपती पुरस्कार प्राप्त झाला. खेळाबरोबर मी माझ्या आहार, व्यायाम यांकडेही लक्ष केंद्रित केले. कारण जर आपण निरोगी असू, तर स्पर्धेत चांगल्या प्रकारे खेळू शकतो. तसेच, शिक्षण ही काळाची गरज आहे. शिक्षणामुळे खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी मोठमोठ्या अडचणींना तोंड दिले. त्यामुळे आज ज्या स्त्रिया शिक्षण घेतल्यामुळे आपल्या पायावर उभ्या आहे, त्या आपले जीवन स्वाभिमानाने जगत आहेत. शिक्षण ही काळाजी गरज झाली. आज कोणत्याही क्षेत्रात जायचे असेल, तर पहिले शिक्षण विचारले जाते. त्यासाठी शिक्षणाचे धडे घेणे महत्त्वाचे आहे. आजच्या काळात कोणत्याही पदावर जायचे असेल, कोणतेही काम करायचे असेल, तर त्या व्यक्तीचे शिक्षण विचारात घेतले जाते. आजच्या काळात जर मान, संपत्ती मिळवायचे असेल, तर पहिले त्या व्यक्तीने शिक्षण घेणे आवश्यक आहे.अन्य खेळांच्या तुलनेत हॅण्डबॉल खेळाचे स्वरूप वेगळे आहे. स्पर्धात्मक हॅण्डबॉलसाठी वेगवेगळ्या पद्धतीने सराव करणे गरजेचे आहे. त्याच्या जोडीला सकस आहार करणे अनिवार्य असते आणि स्पर्धकाला निरोगी ठेवणारे टी-शर्ट आणि बूट गरजेचे असतात. याव्यतिरिक्त नियमित व्यायाम करणे अत्यावश्यक आहे. आपल्या देशात हॅण्डबॉल या खेळाची माहिती अल्पप्रमाणात लोकांना आहे. शारीरिकदृष्ट्या चांगले असणे आपल्या संपूर्ण आयुष्यातील गुणवत्ता सुधारेल. तसेच धकाधकीच्या जीवनात महिलांना व्यायाम करायला वेळ नाही. त्यांनी असे न करता व्यायाम करणे गरजेचे आहे. तरुणींनी कला याव्यतिरिक्त क्रीडाक्षेत्राकडे सकारात्मकदृष्ट्या पाहण्याची गरज आहे, असे हॅण्डबॉल खेळाडू स्नेहल वाघुले यांनी सांगितले.
क्रीडाक्षेत्राकडे सकारात्मकदृष्टीने पहा - स्नेहल वाघुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 2:33 AM