पक्षात काही मुद्यांवर चर्चा व्हावी, असे पत्र या तीन नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना दिले. त्यावर चर्चा व्हावी अशी माफक अपेक्षा या तीनही नेत्यांची होती. पण इंदिराजी, राजीवजी यांच्या भोवती अकर्तृत्ववान नेत्यांची कोंडाळी नेहमी असे आणि ही मंडळी पक्षहितापेक्षा स्वहिताला नेहमी प्राधान्य देत आणि नेत्यांना चुकीचे मार्गदर्शन करीत. तीच परिस्थिती सोनियाजींचे बाबतीत होती. (याचे दूरगामी झालेले परिणाम आज काँग्रेस भोगत आहे.)
शिवाजी पार्क मुंबईतील सर्वांत मोठे पटांगणात संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मोठ्या सभा होत. त्यानंतर गेली अनेक वर्षे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मोठ्या सभा विजयादशमीच्या दिवशी होत, पण कोणीही काँग्रेस नेता तेथे सभा घेण्याचे धाडस करीत नसे. पण शरदरावांनी तेथे प्रचंड मोठी सभा घेऊन महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का दिला. (हे पाहून काही जुन्या काँग्रेस नेत्यांनी या तिघांवरील कारवाई ही काँग्रेसला हानी पोहोचवेल याचा अंदाज बोलवून दाखविला होता.)
जूनमध्ये पक्षाची स्थापना, महाराष्ट्राच्या ३४ जिल्ह्यात पक्षाची कार्यकारिणी वगैरे प्रक्रिया पूर्ण करत असतानाच ऑगस्टमध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. बऱ्यास वर्षानंतर लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होत होत्या. एकीकडे पक्ष संघटना स्थापन करीत असताना दुसरीकडे या निवडणुकीत उमेदवार शोधण्याचे काम शरदरावांना करावयाचे होते. सोबतीत असलेली मर्यादित नेते मंडळी, साधनांची कमतरता, आर्थिक चणचण, राष्ट्रवादी पक्षाचे नवीन चिन्ह या सर्वांवर मात करीत त्यावेळी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवली. केंद्रात मात्र अटलबिहारींचे नेतृत्वाखाली एन.डी.ए. चे सरकार आले. महाराष्ट्रात शिवसेना-भा.ज.प. युती, काँग्रेस, राष्ट्रवादी कुणालाच बहुमत न मिळाल्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली. १९९४ ते १९९९ या काळात युतीचे सरकार होते.त्यामुळे महाराष्ट्राची अवस्था बिकट झाली होती, पुन्हा युतीचे सरकार येऊ नये यासाठी दोन्ही काँग्रेसने एकत्र येऊन सरकार बनवावे, असा मत प्रवाह समोर आला. शरदरावांची भूमिका देखील जातीयवादी सरकार नको म्हणून सामंजस्याची भूमिका होती. काँग्रेसमधील काही मंडळींची ताठरभूमिका शरदरावांबरोबर एकत्र येणे नाही, परंतु झालेल्या परिस्थितीला सामोरे जायचे असेल तर शरदरावांशी समझोता केलाच पाहिजे, असा वास्तववादी विचार केला गेला. त्यावेळी काँग्रेसचे आमदार जास्त होते त्यामुळे सेना-भाजप युतीत जसा फॉर्म्युला वापरला गेला तसाच तो काँग्रेस-राष्ट्रवादीनेसुध्दा अनुकरण केला. आणि काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री, तर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ उपमुख्यमंत्री झाले आणि दोनही काँग्रेसचे मनोमिलन झाले.
सन २०१४ प्रमाणेच २०१९ लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींची लाट कायम राहिली. २०१४ पेक्षा जास्त जागा मिळाल्यामुळे भाजपचा अश्वमेध चौफेर दौडू लागला. पण स्वतंत्र निवडणुका काढल्यामुळे काय होते याची चारही पक्षांना जाणीव झाली, सर्वजण जमिनीवर येऊन एकत्र येण्याची भाषा बोलू लागले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी फार खळखळ न करता तयार झाली. पण युती मात्र होण्यात अगदी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना मातोश्रीवर यावे लागले. बंद खोलीत काही खलबते झाली आणि शेवटी युती झाली. (पण बंद खोलीत काय झाले हे मात्र आजही गुलदस्तात आहे. त्यामुळे पुढचे रामायण घडले.)
निवडणुकीत आपणच सत्तेवर येण्याच्या या घमेंडीत भाजप होता. फोडाफोडीचे राजकारण मोठ्या प्रमाणावर केले गेले. अनेक दिग्गज मंडळी राष्ट्रवादी सोडून भाजपच्या दरबारी सरदार म्हणून रुजू झाली.माध्यमांनीही भाजपचीच तळी उचलून धरली. राष्ट्रवादी मात्र शरदरावांचे नेतृत्वाखाली मजबूतपणे सामोरी गेली. शरदरावांचा अतिशय खालच्या शब्दांत अवमान करण्यात आला. १०-१५ पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, अशी भविष्यवाणी अनेकांनी वर्तवली. पण, या ८० वर्षांच्या योद्ध्याने भरपावसात साताऱ्यात केलेली करामत उभ्या महाराष्ट्राने पाहिली. आणि शरदरावांच्या मागे आपली ताकद उभी केली. भाजपचे गर्वाचे घर खाली केले.
भाजप-सेना युतीला बहुमत मिळाले, पण जे शब्द दिले होते. ते पाळले जात नाहीत. भाजप आता बदलला आहे अशी धारणा सेनाप्रमुखांची झाली, दुसरीकडे केंद्रातील यंत्रणांचा धाक दाखवून आपण आपले इप्सित साध्य करू अशा भूमिकेत भाजप गाफिल राहिला. २०१४-१९ मध्ये युतीने केलेला कारभार दोन्ही पक्षांना दिलेला त्रास, याची जाणीव आघाडीच्या नेत्यांना होती. त्यामुळे काय होणार अशा विवंचनेत असताना गेली ५० वर्षे राजकारणात माहीर असलेल्या, पावसात भिजलेल्या योद्ध्याने महाराष्ट्राची सूत्रे हाती घेतली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर प्रथम काँग्रेस-राष्ट्रवादीत एकमत करण्याचे काम अगदी सोनियांजींच्या मदतीने केले. आता प्रश्न आला शिवसेनेला कसे बरोबर घ्यायचे. गेली अनेक वर्षे एकमेकांचे विरोधात अगदी कडवटपणे लढलेले, वैचारिक मतभेद असलेले पक्ष एकत्र कसे येणार? हे कदापि शक्य नाही असे अनेक धुरिणांचे अंदाज शरदरावांनी सपशेल चूल ठरविले. सेनेच्या नेत्यांनी देखील भाजपने दिलेल्या वागणुकीचा बदला घेण्याचे ईर्षेने लवचिक भूमिका घेत शरदराव मनावर घेत असतील तर साथ देऊ अशी भूमिका घेतली. अनेक बैठका, चर्चा, वाद झाले. पण साहेबांनी जे घडणार नाही ते घडवून दाखवले. सन्मानाने तीनही पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले.
आज राष्ट्रवादी २२ वर्षे पूर्ण करीत आहे. महाराष्ट्रात एक हाती सत्ता मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ३ वर्षांनी विधानसभा निवडणुका होतील त्यावेळी राष्ट्रवादी आपला रौप्यमहोत्सव साजरा करणार आहे. यापुढील ३ वर्षांत अनेक आव्हानांना सामोरं जात असतांना राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर कसे राहील, आपला कार्यकाळ पूर्ण करण्याची भूमिका अर्थात शरदरावांवरच असणार आहे.
पण शरदराव असतील तर ‘सब मुमकीन है!" हे आपल्याला पहायला मिळेल.