पुणे : पावसाळा आला की, पर्यटनाला अक्षरश: ऊत येताे. किल्ल्यांवर भटकंती करण्याला प्राधान्य दिले जाते; परंतु, किल्ल्यांवर किती लाेकांचा वावर सयुक्तिक आहे, याचा विचारच केला जात नाही. शहरात होणारी गर्दी आता सुटीच्या दिवशी किल्ल्यांवर होत आहे. लोहगडावर रविवारी हजारो पर्यटक चार तास अडकून पडले होते. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे पर्यटन विभाग आता चेंगराचेंगरीची वाट पाहात आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
फाेटाे, रिल्सच्या माेहापायी जीव धाेक्यात
फोटो किंवा रिल्सच्या मोहापायी जोखीम घेतली जाते. गाइड घेऊन न जाणे, कठीण कड्यांवर फोटोसाठी प्रयत्न करणे आणि अतिआत्मविश्वास ही अपघातांची मूळ कारणे आहेत, असे रेस्क्यू समन्वयक ओंकार ओक यांनी सांगितले.
‘हाॅटस्पाॅट’चे नियाेजन गरजेचे!
अनेक ठिकाणी ‘बॉटलनेक्स’ तयार होत असून, एखाद्या प्रसंगी चेंगराचेंगरी होऊन अतिशय दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता आहे. शासनाने यावर निर्बंध घातले नाहीत, तर सह्याद्रीत मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढून पर्यटन अतिशय वेगळ्या वळणाला जाऊ शकते. या ‘हॉट स्पॉट्स’चे अतिशय काटेकोर नियोजन करणे हा एकमेव मार्ग आहे.
प्रवेश मर्यादेबाबत विचार करणे आवश्यक
लोहगडावर २५ रुपये प्रवेश शुल्क घेतले जाते. किती पर्यटकांना प्रवेश द्यायचा यावर मर्यादा आवश्यक आहे, असे काही पर्यटकांचे म्हणणे आहे.
रविवारी २ जुलै रोजी चेंबूर येथील पाच-सहा पर्यटकांनी माहुली किल्ल्यावर जाताना पायथ्याच्या डॅमपासून चुकीची वाट धरली. त्यांनी रेस्क्यूला कॉल केला. लाइव्ह लोकेशन मागवून माहुली येथील गुरुनाथ आगीवले, रघुनाथ आगीवले व सुनील आगीवले ह्यांच्याशी संपर्क साधला. हे तिघे भर पावसात गडावर निघाले. तिघांनी तासाभरात त्यांची सुटका केली.
- ओंकार ओक, रेस्क्यू समन्वयक, पुणे