निगडी : दिवस-रात्र फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर व्यस्त असलेल्या तरुणाईला पोकेमॉन-गो या मोबाइलवरील गेमनेही आता वेड लावले आहे. या खेळातील पोकेमॉनला शोधण्यासाठी युवक-युवती अक्षरश: उद्योगनगरीतील रस्त्यावर भरकटलेली दिसून येत आहे. पिंपरी, निगडी-प्राधिकरण, आकुर्डी, चिंचवड, वाकड आणि हिंजवडी या भागातील रस्त्यांवर दिवसासह रात्री-अपरात्री मोबाइलमध्ये पोकेमॉनचा शोध घेत असल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. पोकेमॉन गो हा खेळ मोबाइलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर इंटरनेटच्या साहाय्याने खेळता येतो. महाविद्यालयीन युवकांसह लहान मुलांना वेड लावणारा हा खेळ आहे. या खेळात मानवासारखा एक रोबोट दाखविण्यात आला असून, त्याचे नाव पोकेमॉन गो आहे. या खेळाची सुरुवातच अतिशय उत्साह निर्माण करणारी असून, मोबाइलवर खिळवून ठेवणारा आहे. मोबाइलवर हा खेळ खेळताना, खेळामध्ये वापरण्यात आलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान हे पोकेमॉन कोठे लपून बसला आहे. या संदर्भात दिशा दाखविण्यास मदत करते. खेळ सुरू असताना ज्या दिशेला पोकेमॉन असल्याचे समजते, त्या दिशेला गेल्यानंतर पोकेमॉन सापडत असल्याचे युवकांनी सांगितले. त्यानुसार, पिंपरी-चिंचवडमधील तरुणाईला या खेळाचे वेड लागले असून, बहुतांश युवकांनी हा खेळ आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड केला आहे. पिंपरी, आकुर्डी, चिंचवड, निगडी-प्राधिकरण या भागातील महाविद्यालयांच्या परिसरामध्ये हा खेळ खेळताना युवक-युवती मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. खेळतांना पोकेमॉनची दिशा रेल्वे स्टेशन, बस स्टँड, नदी, नाले ज्या दिशेकडे दाखवेल, त्या दिशेने तरुणाई पोकेमॉनला शोधण्यासाठी सैराट झालेले दिसून येत आहेत. हा खेळ खेळणाऱ्यांना आजूबाजूचेही भान राहत नसल्यामुळे, पालकांच्या चिंतेचा विषय बनला आहे. (वार्ताहर)
काय आहे पोकेमॉन गो?
नितांदो या जपानी कंपनीने हा खेळ विकसित केला असून, पोकेमॉन गो असे या खेळाचे नाव आहे. या कंपनीने आठवडाभरापूर्वी हा खेळ विकसित केला आहे. हा खेळ भारतात अधिकृतरीत्या उपलब्ध झाला नसला, तरीही पायरेटेड व्हर्जन या अॅप्सद्वारे हा खेळ मोबाइलमध्ये डाऊनलोड करता येतो. इंटरनेटद्वारे पोकेमॉन गो हा खेळ खेळता येत असून, पोकेमॉन गोला शोधता येते.
या खेळामधील पोकेमॉन गोला शोधण्यासाठी ज्या दिशेला पोकेमॉन असण्याची दिशा मिळते. त्या दिशेला तरुणाई मोबाइल घेऊन तरुणाई भरकटते. यामुळे रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या खेळाच्या आहारी गेल्यास मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता असून, तरुणांचे अभ्यासाकडेही दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तरुणांनी या खेळाकडे दुर्लक्षच केलेले बरे आहे. - डॉ. किरण गुजर, मानसोपचारतज्ज्ञ, वायसीएम रुग्णालय, पिंपरी