पुणे: थकविलेले सर्व पैसे भरल्याचे डीएचएफएल कंपनीने कळविल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम आणि मुलगा नितेश राणे यांच्याविरोधात पुणेपोलिसांनी काढलेली लुक आऊट नोटीस मागे घेण्यात आली असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
डीएचएफएल बँकेकडून घेतलेले ६५ कोटी रुपयांपैकी ६१कोटी २२ लाख रुपयांचे कर्ज थकविल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी गेल्या महिन्यात लूक आऊट नोटीस जारी केली होती. डीएचएफएलकडून हे कर्ज घेतले होते. राणे कुटुंबियांबरोबरच एकूण ३० जणांचा यात समावेश होता.
दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या कंपनीने याबाबत केंद्र सरकारकडे तक्रार नोंदविली होती. पुणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी ३ सप्टेबर रोजी लुकआऊट नोटीस बजावली होती. डीएचएफएलकडून पुणे पोलिसांना नुकतेच एक पत्र प्राप्त झाले. त्यात संबंधितांनी सर्व पैसे भरल्याचे कळविले. त्यानंतर पुणे पोलिसांनी जारी केलेली लुकआऊट नोटीस मागे घेण्यात आली आहे.