पिंपरी : उड्डाणपूल हे विकासाचे सेतू मानले जात असले, तरी उड्डाणपुलांच्या कामात ठेकेदारांवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा वचक नसल्याने जनतेच्या पैशांची लूट होत आहे. काही पुलांचा दुपटीने नव्हे, तर दहा पटींनी खर्च वाढविला आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचा फटका शहरवासीयांच्या तिजोरीला बसला आहे. मूळ किमतीपेक्षा दहा पटींनी वाढ देऊन पालिकेने ठेकेदारांचे खिसे भरले आहेत. पिंपरीतील एम्पायर इस्टेट, चिंचवड येथील केएसबी चौक, कुदळवाडी चौकाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यावर कोणीही लोक प्रतिनिधी भाष्य करीत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.पिंपरी-चिंचवड शहराचा विकास वेगाने झाला, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. मात्र, एकमुखी सत्तेच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक प्रकल्प रेटून नेले आहेत. रस्ते, उड्डाणपूल अशी विकासकामे मोठ्या प्रमाणावर झाले असले, तरी नियोजनाचा अभाव आणि विकासकामांवर पदाधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने उड्डाणपुलांचा खर्च कोट्यवधींच्या पटीत वाढला आहे. ठेकेदार, पदाधिकारी आणि अधिकारी अशी रिंग असल्याने बोलायचे कोणी असा प्रश्न आहे. सत्ताधाऱ्यांना विरोध करणाऱ्यांचाही आवाज क्षीण असल्याने वाढीव खर्चावर कोणाचेही निर्बंध नसल्याचे दिसून येतात. काळेवाडी देहू-आळंदी बीआरटी मार्गावर केएसएसबी चौकात उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. जे कुमार यांनी हा पूल १.२ किलोमीटर उभारण्यास सुरुवात केली आहे. त्याचा मूळ खर्च ११० कोटी आहे. मार्च २०१४ पासून या पुलाचे काम सुरू झाले असून, अडीच वर्षांची मुदत ठेकेदाराला दिली आहे. सहा महिने शिल्लक राहिले असले, तरी काम संथगतीने सुरू असल्याचे दिसून येते. या कामासाठी सुमारे ५० कोटी रुपये ठेकेदाराला अदा केलेले आहेत. काम रखडल्याने या चौकातील वाहतूककोंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. कुदळवाडीत टाटा कंपनीच्या सीमेवर प्राधिकरणाच्या वतीने उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू केले. हे काम मातेरे कंपनी करीत आहे. या कामाची मुदत संपूनही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीला खुला केलेला नाही. तसेच या उड्डाणपुलासाठीचा राडारोडाही पडून आहे. (प्रतिनिधी)पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर एम्पायर इस्टेट, चिंचवड येथे पवना नदी काळेवाडी ते पिंपरीत आॅटो क्लस्टर असा १.६ किलोमीटरचा रस्ता तयार करण्याचे काम आॅक्टोबर २०११ मध्ये सुरू झाले. त्या वेळी त्याचा खर्च होता ९९ कोटी. गॅमन इंडियाला हे काम देण्यात आले होते. त्या कामाची सप्टेंबर २०१५ ही शेवटीची मुदत मात्र, काम पूर्ण न झाल्याने जून २०१६ ही मुदत दिली होती. मात्र, अजूनही काम पूर्ण झालेले नाही. आतापर्यंत ६०.९० कोटी ठेकेदाराला अदा केलेले आहेत. वाढीव दर मिळावा, अशी मागणी ठेकेदाराने केली आहे. गॅमन इंडियाच्या वतीने पुलाचे काम संथगतीने केले जात आहे. याबाबत सर्वसाधारण सभेतही प्रश्न उपस्थित झाला होता. अशा ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अशी मागणीही केली होती. पुढे काहीही झालेले नाही. पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी या विषयावर तोंडावर बोट ठेवले आहे.सल्लागारांवरकारवाईची मागणी रस्ते, उड्डाणपुलाच्या कामांसाठी महापालिकेने सल्लागार नेमलेले आहेत. मात्र, हे सल्लागार केवळ प्रकल्पांची टक्केवारी घेण्यापलीकडे काहीही करीत नाहीत. सल्लागारांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. सल्लागार असतानाही वाढीव खर्च होतो कसा, सल्लागारांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
उड्डाणपुलातून जनतेच्या पैशांची लूट
By admin | Published: June 02, 2016 12:33 AM