पुणे : दुकान बंद करुन घरी जात असलेल्या व्यापाऱ्याकडील पैशाची बॅग हिसकावून चोरट्यांनी पोबारा केला. यावेळी या तिघांचा पाठलाग करणाऱ्यांवर चोरट्यांनी गोळीबार केला. शहराच्या मार्केटयार्डमधील गल्ली क्रमांक 3 मध्ये गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मात्र, पोलिसांनी या गोळीबाराच्या घटनेबाबत अजब तर्क व्यक्त केल्यानं व्यापारांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, मार्केटयार्डमधील गल्ली क्रमांक तीन मध्ये आशिष गुप्ता यांचे पुरणचंद अँड सन्स हे दुकान आहे. रात्री साडेआठच्या सुमारास ते दुकान बंद करत होते. त्यावेळी तिघे जण दुचाकीवर आले. हेल्मेटधारक हे तिघेही गुप्ता यांच्याशी बोलू लागले, तेव्हा त्यांनी आता दुकान बंद झाले आहे, असे सांगितले. त्याचबरोबर त्यांच्यातील एकाने त्यांच्या हातातील पैशाची बॅग जबरदस्तीने ओढून घेऊन ते पळून जाऊ लागले, हे पाहून त्यांचा एक कामगार त्यांचा पाठलाग करु लागला. त्याने विश्वेश्वर बँकेजवळ त्यांना गाठून पकडण्याचा प्रयत्न केला. तर, ते खाली पडल्याने कामगार त्यांना पकडू लागल्यावर त्यांच्यातील एकाने आपल्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला व ते पळून गेले. या व्यापाऱ्याच्या बॅगेत 65 हजार रुपये असल्याचे सांगण्यात येते. या प्रकाराने घाबरून गेलेल्या गुप्ता यांनी आपण उद्या तक्रार देणार असल्याचे सांगितले. ही घटना समजल्याबरोबर परिसरातील व्यापारी गोळा झाले. काही वेळाने मार्केटयार्ड पोलीसही तेथे आले. मात्र, हा सर्व प्रकार गांभीर्याने घेण्याऐवजी हा प्रकार गोळीबाराचा नाही, त्यांनी टिकल्याचे पिस्तुल वापरले, असे सांगण्याचा प्रयत्न मार्केटयार्डचे पोलीस अधिकारी करू लागले. त्यामुळे तेथील व्यापाऱ्यांनी टिकल्याच्या पिस्तुलाचा इतका मोठा आवाज येत नसल्याचे सांगितले़
15 दिवसात दुसरा प्रकारव्यापाऱ्याला लुटण्याचा हा 15 दिवसात दुसरा प्रकार आहे. दिवाळीमध्येच पेट्रोल पंपावरील जमा असलेली लाखो रुपयांची रक्कम बँकेत भरायला जात असताना पेट्रोल पंपावरील मॅनेजरला भर दिवसा लुटण्यात आले होते. त्याचा तपास अद्याप लागला नसताना हा दुसरा प्रकार घडला आहे़
रस्त्यावरील दिवे बंदमार्केटयार्ड येथे हा प्रकार घडला तेव्हा या रस्त्यावरील दिवे बंद होते़ तसेच या रस्त्यावर तीन बँका आहेत. तरीही त्या परिसरात एकही सुरक्षा रक्षक नव्हता़ दिवाळीत अचानक सुरक्षा रक्षक बदलल्यानंतर ते व्यापाºयांची तपासणी करु लागले होते. त्यामुळे त्यांची सुरक्षितता धोक्यात आली असल्याचे तक्रार प्रवीण चोरबेले यांनी केली.