लोणी काळभोर : मित्राच्या घरी जेवण करून मध्यरात्री घरी निघालेल्या इसमाला होंडा सिटी कारमधून आलेल्या चौघांनी मारहाण करून, जिवे मारण्याची धमकी देऊन मोबाईल व रोख रकमेसह त्याच्याकडील साडेसात हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचा एक साथीदार फरार आहे.
याप्रकरणी मोहन दिलीप मोरे (वय २२), रोहित रंजू अडागळे (वय २१) व सागर संदीप गुंडेकर (वय १९. तिघे रा. इंदिरानगर, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघांनीही सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार: या संदर्भात दत्तात्रय बाबूराव ढोनुक्षे (वय ३५, रा. संभाजीनगर, धनकवडी, पुणे, मूळ गाव ऐनापूर, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय ढोनुक्षे हे पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील द बेंजन ओपल येथे कुक म्हणून काम करीत आहेत. २० आॅगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजता ते लोणी काळभोर येथे रहात असलेल्या त्यांचा मित्र समीर मकादार यांच्या घरी आले होते. जेवण, गप्पा झाल्यावर रात्री साडेबारा वाजता ते घरी जाण्यासाठी लोणी फाटा येथे आले. या वेळी तेथे आलेल्या सोनेरी रंगाच्या होंडा सिटी गाडीत घरी जाण्यासाठी ते बसले. गाडी स्वारगेट मार्गे धनकवडी येथे आल्यावर गाडीतील चौघांनी तेथे गाडी थांबवली नाही. या वेळी त्या चौघांनी ढोनुक्षे यांना शिवीगाळ करून मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच, बळजबरीने खिशातील मोबाईल, रोख रक्कम व एक सॅक असा साडेसात हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन दत्तात्रय यांना कात्रज घाटातील बोगद्याच्या अलीकडे सोडले व ते निघून गेले. त्यानंतर एका मित्राच्या मदतीने ते घरी गेले. आज त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर, लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने हालचाली करत चोवीस तासांच्या आत तिघांना ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे.