शेलपिंपळगाव : तीर्थक्षेत्र अलंकापुरीत खासगी पार्किंगवाल्यांकडून भाविकांची मोठ्या प्रमाणात लूटमार केली जात आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे ही लूटमार अधिक फोफावली आहे. खासगी जागा किंवा त्या जागेच्या शेजारील विनामालकी जागेत भाविकांनी पार्क केलेल्या वाहनांचेही अधिक दर लावून संबंधितांकडून पैसे वसूल केले जात आहेत. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाचा लाभ मिळविण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक अलंकापुरीत येत आहेत. दिवाळी उत्सव, तसेच सलग असलेल्या सुट्यांमुळे भाविकांच्या गर्दीने तीर्थक्षेत्र आळंदी गजबजून जात आहे. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या मंगलमय दिनी माऊलींसमोर नतमस्तक होऊन दर्शन घेण्याची हजारो भाविकांची इच्छा असते. मात्र, अलंकापुरीत पार्किंग जागेच्या असलेल्या अभावामुळे भाविक मोकळ्या जागेत वाहनांची पार्किंग करून मंदिराकडे मार्गस्थ होत असतात, तर मंदिर पार्किंगच्या जागेची माहिती असलेले भाविक मंदिर पार्किंगमध्ये वाहने पार्क करून दर्शनासाठी जातात. परंतु नवीन पार्किंगची जागा जर सापडली नाही, तर असे भाविक मिळेल त्या मोकळ्या जागेत वाहने पार्क करतात. परिणामी, दर्शनानंतर वाहनस्थळी पार्क जागेची पावती दाखवत खासगी जागा असल्याचे सांगून भाविकांकडे अवाच्या-सवा पैशांची मागणी केली जात आहे. अल्पदराची पावती दाखवून पार्किंगचे भाडे घेतले जाते. अनेक वेळा वाहनांचे पासिंग नंबर पाहून वेगळी पावती देऊन भाविकांची आर्थिक लूट केली जात आहे. वाहनानुसार ५० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत भाडे आकारले जाते. भाडे देण्यास जर भाविकांनी नकार दिला, तर संबंधित व्यक्ती भाविकांना शिवीगाळ करून जबरदस्ती भाडे वसूल करत आहेत.
अलंकापुरीत वाहनतळ मालकांकडून भाविकांची लूट
By admin | Published: November 11, 2015 1:33 AM