माळेगाव: खामगळवाडी (ता. बारामती) येथील दगड खाणीतून बेकायदा मुरूम व दगडाचे उत्खनन करून शासनाची करोडो रुपयांची लूट केल्याचा आरोप होत आहे. दगडमाफिया ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी ग्रामस्थांनी घंटानाद आंदोलन करून खाणी बंद करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घोटाळ्याकडे लक्ष घालण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
खामगळवाडी (ता. बारामती) येथील दगड खाणीतून ठेकेदाराने गट नंबर २९ मधून दोन हजार ६०० ब्रासची उत्खनन परवानगी असताना लाखो ब्रास मुरूम व दगडाचे उत्खनन केले. तसेच, शासनाची करोडो रुपयांची लूट केल्याची तक्रार आहे. बारामती तालुक्यात वाळूतस्कर, मुरूमतस्कर चांगलाच सोकावला असताना आत्ता चक्क दगडमाफियाचा घोटाळा समोर आलेला आहे. या कथित दगडमाफिया ठेकेदार शासनास करोडो रुपयांचा कररूपात चुना लावलेला आहे. या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्यांचे दगडमाफिया ठेकेदाराकडून बुडवलेली रॉयल्टी वसूल करावी, यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. या घंटानाद आंदोलनाची सुरूवात पणदरे बाजारतळ येथून करण्यात आली.
खामगळवाडी येथे शेकडो ग्रामस्थांनी एकत्र जमून घंटानाद आंदोलन करून निषेध सभा घेतली. यावेळी विक्रम कोकरे, अशोक खामगळ, ज्ञानदेव खामगळ, व इतरांनी मनोगत व्यक्त करुन ठेकेदारावर कारवाईची मागणी केली. जीपीएस प्रणालीदावरे एटीएस मशीनद्वारे मोजणी करण्याची मागणी आंदोलनकर्ते विक्रमकोकरे यांनी केली आहे.
शासनाचा महसूल बुडवणाऱ्यावर कारवाई करा, गावाचा महसूल बुडवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशा घोषणा दिल्या जात होत्या. पंधरा दिवसांत ठेकेदारावर योग्य कारवाई न केल्यास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. कर वसूल न झाल्यास दगड खाणीमध्ये आत्मदहन करण्याचा इशारा आंदोलक कोकरे यांनी दिला आहे. या खाणीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून त्याचा फटका वन्यजीवांना होत आहे. तरी ही दगडखाण कायमची बंद करा,अशी मागणी येथील ग्रामस्थ अशोक खामगळ यांनी केली आहे.