तळेघर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भीमाशंकराच्या दर्शनासाठी नाताळ सुटीनिमित्त व नवीन वर्ष स्वागतासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. भाविकांना वाहनतळ ते मंदिरापर्यंत जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या मिनीबस उपलब्ध नसल्याने काही भाविकांना दोन- दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे तर काही भाविकांची खासगी वाहनचालक मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करीत आहेत. या मानसिक त्रासामुळे अनेक भाविकांनी देवस्थान व प्रशासनाच्या नियोजनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी महाशिवरात्री, श्रावण महिना व नाताळ तसेच नववर्ष स्वागतासाठी दरवर्षीच उच्चांक गर्दी होत असते. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे शासनानी लादलेल्या निर्बंधामुळे काही प्रमाणात गर्दी कमी झाली होती; परंतु, चालू वर्षी सुरुवातीपासूनच रेकाॅर्ड ब्रेक गर्दी झाली आहे. सध्या नाताळ सुटी, नववर्ष स्वागतासाठी पर्यटक भाविक भक्तांप्रमाणेच शालेय सहलीमुळे भाविकांची गर्दी होऊन भीमाशंकर परिसर गजबजलेला आहे; परंतु, भीमाशंकर येताच अलीकडे सहा ते सात किमीपासूनच भाविकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोंढवळ फाट्यादरम्यान नवीन रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे मोठ्या वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले आहेत. तर पार्कींग नंबर तीनपासून बस स्टॅंडपर्यंत वाहनचालक हे वाहने आडवी- तिडवी लावत असल्यामुळे येणाऱ्या भाविकांना मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहेत. अपंग विकलंग, लहान मुले, वयवृद्ध माणसे यांचे प्रचंड हाल होत आहेत. वयोवृद्ध माणसे लहान मुले यांना कडक उन्हामध्ये दोन दोन किमी अंतरावर पायपीट करावी लागते. अनेक व्यक्तींना हृदयविकार त्याचप्रमाणे अनेक आजार असतानाही दोन किमी चालण्याशिवाय पर्याय उरत नाही. मात्र, याचे काही सोयरसुतक प्रशासनाला नाही. दरम्यान, याच संधीचा फायदा घेत खासगी वाहतूक करणारे हे बाहेरून आलेल्या भाविकांना वेठीस धरत अर्धा ते एक किलोमीटरसाठी प्रतिव्यक्ती एक हजार रुपये बसस्थानकापर्यंत जाण्यासाठी घेत आहे. तर मोटारसायकल चालक प्रति व्यक्तिमागे सहाशे ते सातशे रुपये घेऊन भाविकांची आर्थिक लूट करत आहे. तर हेच खासगी वाहनचालक इतर दिवशी मंदिरापासून सहा किमी अंतरावर असलेल्या निगडाळेजवळील कालभैरवनाथ मंदिराजवळ असलेल्या एका शेतामध्ये मोठ्या बससाठी वाहनतळांवर तयार करून भीमाशंकरला येणारे बसमधील भाविक व शालेय सहलीतील विद्यार्थ्यांना पुढे रस्त्याचे काम चालू आहे. बस पुढे जात नाही. असे सांगत पाच ते सहा हजार रुपये घेत आपल्या जवळील खासगी वाहनाने त्यांना थेट मंदिरापर्यंत नेत आहे. मात्र, यामध्ये सामान्य भाविकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
श्री क्षेत्र भीमाशंकर हे प्रसिद्ध असे ज्योतिर्लिंग त्याचप्रमाणे पर्यटनाचे ठिकाण आहे. महाशिवरात्री व श्रावण यात्रा सोडल्या तर प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन केले जात नाही. ना वाहतुकीचे नियोजन ना इतर सोयी- सुविधांचे नियोजन भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांना संताप व्यक्त करतच जावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात हाेणाऱ्या गर्दीमध्ये कोणता अनुचित प्रकार घडला तर यास जबाबदार कोण, असा प्रश्न येणाऱ्या भाविकांना पडला आहे.
''प्रशासनाकडून हाेणारी वाहतूक ही कायमस्वरूपी बंद करून प्रशासनाने ठोस पावले उचलत कायमस्वरूपाची व्यवस्था द्यावी. - जीवन माने, सहायक पोलिस निरीक्षक, घोडेगाव''
''श्री क्षेत्र भीमाशंकर येथे मिनीबस नियोजनाबाबत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना मिळाल्या नाहीत. - वसंत अरगडे, आगार व्यवस्थापक''