पुणे : रेल्वेमंत्रिपदावर बिहार-पश्चिम बंगालचे वर्चस्व असल्याने महाराष्ट्राला नेहमीच सावत्रपणाची वागणूक; त्यातही आर्थिक राजधानी राज्याच्या वाट्याला आलेला बहुतांश भाग मुंबईलाच जात असल्याने पुण्याचे रेल्वेचे अनेक प्रश्न रखडले आहेत. सुरेश प्रभू यांनी तरी पुण्याची ही सावत्रपणाची वागणूक बदलून रेल्वेबाबतचे प्रश्न सोडविण्याची पुणेकरांची मागणी आहे. रेल्वेमंत्री झाल्यानंतर शनिवारी प्रथमच सुरेश प्रभू हे पुण्यात येत आहेत़ या भेटीत त्यांच्याकडून पुण्यातील रेल्वेच्या विकासासाठी भरीव घोषणा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़ देशातील सातवे महानगर म्हणून पुणे उदयाला येत आहे. मात्र, कोणत्याही मेट्रोसाठी गरज असलेली रेल्वेची जीवनवाहिनी पुण्यात नाही. पुणे- लोणावळा लोकल सक्षमच होऊ शकलेली नाही. चाकणपासून ते जुन्नरपर्यंतचा आणि वाघोलीपासून ते शिरूरपर्यंतचा विकसित औद्योगिक भाग रेल्वेपासून वंचित आहे. पुणे विभाग केवळ नावालाच केला असून याला अद्याप सक्षम करण्यात आलेले नाही. पुण्याच्या रेल्वे स्थानकाची बजबजपुरी झाली असून, हडपसरला दुसरे टर्मिनल म्हणून विकसित करण्याची केवळ घोषणाच राहिली आहे. मुंबई आणि कोकणसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून राज्य शासनाच्या सहभागातून विकासाचे पाऊल उचलले आहे़ त्याप्रमाणे पुण्यावरही प्रभू कृपा व्हावी, अशी पुणेकरांची इच्छा आहे. पुणे ते लोणावळा तिसरी लाइनपुणे-मुंबई या दोन शहरांमधील रेल्वेगाड्यांची संख्या अतिशय कमी आहे़ गेल्या १० वर्षांत एकही नवीन गाडी या मार्गावर वाढविण्यात आली नाही़ याला कारण बिझी असलेला रेल्वेमार्ग. या रेल्वे अंदाजपत्रकात पुणे ते लोणावळा तिसऱ्या लाइनसाठी निधीची घोषणा करण्यात आली आहे़ मात्र, हा निधी अतिशय तुटपुंजा आहे़ रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे ते लोणावळादरम्यानच्या ६४ किमीच्या तिसऱ्या लाईनसाठीचा ९९३़९१ कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे़ सध्या या लाइनच्या कामासाठी केवळ २७ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे़ या अहवालाला रेल्वे बोर्डाने तातडीने मंजुरी देऊन काम सुरूहोण्याची आवश्यकता आहे़ हडपसर दुसरे टर्मिनलपुणे स्टेशनवरून नवीन गाड्या सुरू करणे सध्याच्या परिस्थितीत अशक्य आहे़ पुण्याचा विकास व्हायचा असेल, तर तातडीने दुसरे रेल्वे टर्मिनल सुरू होण्याची आवश्यकता आहे़ त्यासाठी राज्य शासन, पुणे महापालिका यांच्याशी समन्वय साधणारी एखादी समिती स्थापन करून हे काम प्राधान्याने हाती घेण्याची आवश्यकता आहे़
हे ‘प्रभू’, पुण्याबाबत नको सावत्रपणा
By admin | Published: July 18, 2015 4:23 AM