पुणे: पत्नीने पतीविरुध्द कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार न्यायालयात दावा दाखल केला होता. या दाव्याची सुनावणी होत असताना त्यांच्या मुलीची एका वकिलाशी भेट झाली. त्यामुळे त्यांनी त्या लहान मुलीला आई-वडिलांचे एकत्रित प्रेम मिळाले पाहिजे असे ठरवून आई-वडिलांच्या मध्ये समेट घडवून आणण्यासाठी दोघांचे एक वर्षे समुपदेशन केले. अखेर त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मात्र यापुढे मोबाईलचा वापर मर्यादित स्वरूपात करायचा असे दोघांनी ठरवले.
यामुळे पती-पत्नीत पाच वर्षांनंतर समेट झाली असून, गणेश चतुर्थीला गणपती बसवत त्यांनी एकमेकांच्या विरोधात केलेले न्यायालयीन दावे मागे घेत संसाराचा पुनश्च् श्रीगणेशा केला आहे. आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये उच्च पदावर नोकरीस असलेले राहुल आणि स्मिता (नावे बदललेली) यांचा २०१८ साली लग्न झाले. लग्नाच्या काही दिवसानंतर राहुल कामावरून घरी आला असता कधी स्मिता या सतत मोबाईलवर सोशल मीडिया पाहण्यात व्यस्त असायच्या तर कधी राहुल सातत्याने मोबार्इल पाहत बसत. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आणि कौटुंबिक कारणांमुळे २०१९ मध्ये त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे स्मिता माहेरी निघून गेल्या. त्यावेळी स्मिता या सात महिन्यांच्या गरोदर होत्या. त्यांनी माहेरीच मुलीला जन्म दिला. मात्र त्यानंतर त्याच्यातील वाद सुरूच होते. पूजा यांनी दाखल केलेला दावा न्यायाधीश सुधीर बरडे यांनी एका दिवसात आदेश देत रद्द केला. या प्रकरणात अॅड वैभव धायगुडे-पाटील यांना ॲड. संदीप कुडते, अॅड. प्रतिक्षा कांबळे आणि अॅड. विवेक शेरे यांनी सहकार्य केले.
गेल्या पाच वर्षांपासून या जोडप्यात वाद सुरू असल्यामुळे त्यांची लहान् मुलगी जन्मापासून तिच्या आजोळी राहात होती. तिला तिच्या आई-वडिलांचे एकत्र छत्र लाभावे यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश आले. त्यासाठी त्यांचे वर्षभरात अनेकदा समुपदेशन करण्यात आले. काही बाजू जोडप्याने समजून घेतल्या तर ते पुन्हा एकत्र येऊ शकतात, हे या प्रकरणात प्रकर्षाने जाणवले.- अॅड. वैभव धायगुडे-पाटील, पती-पत्नीमध्ये मध्यस्थी करणारे वकील