‘लॉकडाऊन’चा अजित पवारांना फटका? ‘माळेगाव’च्या अध्यक्षपदासाठी मिळणार ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 04:52 PM2020-04-04T16:52:36+5:302020-04-04T17:12:34+5:30
लॉकडाऊनमुळे न्यायालयाने सर्वच याचिकांवरील अंतरिम आदेश ३० एप्रिलपर्यंत कायम केले
बारामती : कोरोना विषाणुजन्य परिस्थितीमुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला आहे.लॉकडाऊनमुळे न्यायालयाने सर्वच याचिकांवरील अंतरिम आदेश ३० एप्रिलपर्यंत कायम केले आहेत.त्यामुळे माळेगांव कारखान्याच्या नवनियुक्त संचालकांनी मुदत पूर्ण होईपर्यंत जुन्या संचालकांना अडथळा न आणण्याचे दिलेले आदेश ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहेत.त्यामुळे नवनिर्वाचित संचालकांना तोपर्यंत पद्भार घेण्याचा,मागण्याचा अधिकार नाही. याबाबत चेअरमन रंजनकुमार तावरे यांनी साखर आयुक्तांना पत्र पाठविले आहे.
माळेगाव कारखाना जुन्या संचालक मंडळाची मुदत ४ एप्रिल २०२० रोजी संपणार असल्याने कार्यकाळ पूर्ण करण्याचा जुन्या संचालक मंडळाचा अधिकार असल्याने माळेगांव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांना ४ एप्रिलपर्यंत कामकाज पाहता येईल. राज्यघटनेच्या ९७ व्या घटना दुरूस्तीच्या तरतुदीनुसार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याचा पदाधिकाऱ्यांना अधिकार असल्याचा निकाल उच्च न्यायालयाने ६ मार्च रोजी आदेश दिले होते.मात्र,हा आदेश १७ मार्च रोजी वाढवुन सुनावणी २३ मार्च रोजी ठेवलेली होती. कोरोना विषाणुजन्य परीस्थितीमुळे याबाबत सुनावणी होवु शकली नाही. त्यानंतर लॉकडाऊन परिस्थितीमुळे उच्च न्यायालयाने सर्वच याचिकांवरील आदेश सुरवातीला १४ एप्रिलपर्यंत,त्यानंतर ३० एप्रिलपर्यंत कायम केले आहेत.त्यामुळे ६ मार्च रोजी उच्च न्यायालयाने जुन्या संचालक मंडळाला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करण्याचा अधिकार असल्याचा दिलेला आदेश देखील ३० एप्रिल पर्यंत कायम आहेत.त्यामुळे नवनिर्वाचित संचालकांना विद्यमान संचालक मंडळास,पदाधिकाऱ्यांना कामकाज करण्यापासुन रोखता येणार नाही,असा दावा विद्यमान अध्यक्ष रंजन तावरे यांनी केला आहे. प्रादेशिक साखर संचालकांनी केवळ राजकीय दबावाखाली अनाधिकाराने पत्र पाठवुन कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील रंजन तावरे यांनी केला आहे.