लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत पुणे जिल्ह्यात तब्बल ७ कोटी ५० लाख रुपयांचे नुकसान झाले. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने मदत करण्यासाठी तब्बल ११ हजार कोटींचे अनुदान जाहीर देखील केले. त्यानुसार काही जिल्ह्यांना निधी वाटपदेखील करण्यात आला. परंतु पुणे जिल्ह्यासाठी साडेसात कोटींची मागणी असताना शासनाकडून पहिल्या टप्प्यात अत्यंत तुटपुंजी रक्कम म्हणजे ५ लाख ७८ हजार रुपये अनुदान दिले आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याच जिल्ह्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा पुणे जिल्ह्यातील तब्बल ३२ हजार ३४७ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तसेच ६४३ कुटुंबाच्या घरांचे, काही झोपड्याचे, गुरांचे गोठे, जनावरे मयत झाली. यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ७ कोटी ५० लाख रुपयांच्या अनुदानाची मागणी केली. परंतु अद्याप शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही.
--------
चक्रीवादळातील बाधित अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत
जिल्ह्यात जून २०२० महिन्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळात जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, हवेलीसह अन्य तालुक्यांना मोठा फटका बसला. यामध्ये हजारो शेतकरी व कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या लोकांना शासनाकडून मदत करण्यात आली खरी, पण ही मदत अर्धवट झाली असून, आजही जिल्ह्यातील खेड, जुन्नर, आंबेगाव आणि मुळशी तालुक्यातील शेकडो बाधित मदतीपासून वंचित आहेत. यासाठी आवश्यक असलेला दहा कोटी निधी मिळावा यासाठी वारंवार मागणी करूनही निधी उपलब्ध झाला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच जिल्ह्यातील बाधित लोकांची शासनाकडून चेष्टा सुरू आहे.