मंचर: एकीकडे कांद्याचे बाजारभाव वाढत असतानाच तालुक्याच्या पूर्व भागातील नागापूर गावात शेतकऱ्यांच्या बराखीत युरिया टाकून सुमारे ७५० कांद्याच्या पिशवीचे नुकसान केले आहे. हा प्रकार आज उघडकीस आला. पंढरीनाथ शिंदे व बाळासाहेब शिंदे या दोन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी कांद्याला बाजारभाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजारात न विकता पुढील काळात चांगला बाजार भाव मिळेल या आशेने कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. मात्र आता कांद्याचे बाजारभाव वाढू लागले आहेत. नागापुर येथील श्री क्षेत्र थापलींग देवस्थानचे पुजारी पंढरीनाथ सोपान शिंदे यांच्या घराशेजारीच त्यांनी बराकीत २५० पिशवी कांदा व तेथून जवळच राहणारे बाळासाहेब मारूती शिंदे यांच्या बराकीत ५०० पिशवी कांदा साठवला होता. कांद्याला चांगला बाजार भाव मिळेल या आशेने साठवलेल्या कांद्यावर अज्ञाताने युरिया टाकला. त्यामध्ये कांद्याचे मोठे नुकसान झाले.
बाळासाहेब शिंदे बराकीशेजारीच शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना बराखीच्या शेजारी युरिया पडलेला दिसून आला. शिंदे यांना शंका आल्याने पंढरीनाथ शिंदे यांना बोलावुन त्या दोघांनी बराकीमध्ये जाऊन पाहिले असता संपूर्ण बराकीमध्ये कांद्यावर युरिया टाकलेला दिसून आला. बाळासाहेब शिंदे यांनी पाच दिवसापूर्वी बराकीतील कांद्याची पाहणी केली असता त्यावेळेस कांदा सुस्थितीत होता. बुधवारी सकाळी त्यांना कांदा बराकीत युरिया टाकल्याचे आढळून आले .
आज शिंदे यांनी पोलिस पाटील संजय पोहकर यांना या घटनेची माहिती दिली.सरपंच गणेश यादव , उपसरपंच भरत म्हस्के , सुनिल शिंदे , पोलीस पाटील संजय पोहकर , प्रकाश पवार यांनी घटनास्थळी जाऊन कांदा बराकीची पहाणी केली. दोशी व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.