लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जुन्या सरकारचा विचार आणि कार्यपद्धतीमुळे देशाचे, महाराष्ट्राचे आणि पुण्याचेही नुकसान झाले. आमच्या सरकारने ही कार्यपद्धती बदलली आणि विकास गतिमान केला, अशा शब्दांत थेट नाव न घेता ‘जुने सरकार’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
राज्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रविवारी दूरस्थ पद्धतीने झाले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हेही दूरस्थ स्वरूपात उपस्थित होते. गणेश कला क्रीडा मंदिरातील कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती होती.
विठ्ठलाचे दर्शन घेणे झाले सोपेपुणे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मेट्रो मार्ग लोकार्पण, स्वारगेट कात्रज भुयारी मार्ग, भिडेवाडा शाळा स्मारक भूमिपूजन, बिडकीन स्मार्ट सिटी लोकार्पण, सोलापूर विमानतळ विकास अशा राज्यातील ११ हजार २४० कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीने झाले. मोदी म्हणाले, सोलापूर विमानतळामुळे विठ्ठलाचे दर्शन घेणे सोपे होईल, मुलींच्या देशातील पहिल्या शाळेचे स्मारक जगाला प्रेरणा देत राहील.
त्यांनी एक खांबही उभा केला नाहीआधीच्या सरकारला मेट्रोचा एक खांबही उभा करता आला नाही. त्यांच्या काळात घोषणा व्हायच्या, पण फाइल अडकायची. पुण्यात आधीच मेट्रो व्हायला पाहिजे होती. आम्ही २०१६ ला काम सुरू केले. आता मेट्रो धावत आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई यांनी सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेच्या जागेवर आता स्मारकाचे काम सुरू होत आहे, असेही मोदी म्हणाले.