पुणे : प्रीपेड टास्क पूर्ण केल्यास चांगला नफा मिळेल असे सांगून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार धानोरी गाव परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी अंजनकुमार (वय ४८) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २ सप्टेंबर २०२३ ते ६ सप्टेंबर २०२३ यादरम्यान घडला आहे.
फिर्यादीत म्हटल्यानुसार, तक्रारदार यांना अज्ञात मोबाइल क्रमांकावरून मेसेज आला. दिलेले टास्क पूर्ण केल्यास चांगला मोबदला मिळेल असे सांगून तक्रारदार यांना लिंक पाठवली. लिंकवर क्लिक केल्यावर टेलिग्रामच्या एका ग्रुपमध्ये ऍड केले. त्यानंतर सुरुवातीला १५० रुपये कमिशन देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदार यांना १६ लाख ५० हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
पैसे गुंतवल्याचा नफा मिळत आहे असे बनावट वेबसाईटवर दिसत होते मात्र प्रत्यक्षात पैसे काढण्यासाठी गेले असता तक्रारदार यांचे पैसे निघत नसल्याने त्यांनी विचारणा केली. तेव्हा लेट फी, टॅक्स, बँक चार्जेस, पेनल्टी टास्क अशी वेगवेगळी कारणे त्यांना सांगण्यात आले आणि आणखी पैसे भरावे लागतील असा तगादा लावला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक भापकर करत आहेत.