आशिष काळे
पुणे : कर्करोगामुळे वयाच्या सहाव्या वर्षी एक हात गमावला... पण तो हरला नाही... शारीरिक मर्यादेला ताकद बनवत तो एका हाताने सायकल चालवू लागला. बघता बघता त्यात प्रावीण्यही मिळविले आणि सायकलस्वारी करत भारत भ्रमंती केली अन् अनेक मोहिमाही फत्ते केल्या. ही कहाणी आहे दिव्यांग सायकलपटू रचित कुलश्रेष्ठ याची... एक हात नसलेल्या रचितने क्रीडा क्षेत्रात भरारी घेतली असून, सायकलपटू म्हणून नाव कमावले आहे.
रचित याने सायकलवरून मनाली ते खारदुंगला पास असा प्रवास पूर्ण केला आहे. तर पुणे ते मुंबई यासह दाक्षिणात्य राज्यांमध्येही त्याने सायकल मोहिमेत सहभाग घेतला आहे. सध्या तो पुण्यातील आयटी कंपनीत नोकरी करत असून, आवड म्हणून तो सायकल मोहिमांमध्ये सहभागी होतो. दिव्यांगत्वाला बाजूला सारून सायकललाच दोस्त बनवत सायकलवरून देशभर प्रवास केलेल्या रचितच्या जिद्दीला अनेकांकडून कौतुकाची थाप मिळत आहे. जागतिक सायकल दिनानिमित्त त्याच्याशी साधलेला संवाद.
रचितने शालेय जीवनातच सायकल चालवायला सुरुवात केली. वडिलांनी त्याला सायकल चालवायला शिकवली. वयाच्या सहाव्या वर्षी कर्करोगामुळे एक हात गमावूनही त्याने हार मानली नाही आणि एका हाताने सर्व कामे करायला शिकला. एका हाताने सायकलही चालवायला शिकला आणि ही सायकलच रचितच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली. वयाच्या २७ व्या वर्षी त्याला दुसऱ्यांदा कर्करोग झाला, त्यामुळे पायाला इजा झाली. पण, तरीही त्याने जिद्द सोडली नाही.
या प्रवासात रचितला कुटुंबीयांनी खूप साथ दिली. सध्या तो एका आयटी कंपनीत नोकरी करत असून, त्यातून वेळ मिळाला की सायकल राइडला निघतो. लोकांनाही सायकलवरून निसर्ग भ्रमंतीसाठी नेतो. येत्या काळात त्याला एव्हरेस्ट मोहीम फत्ते करायची आहे. त्यासाठी सध्या त्याची तयारी सुरू आहे.
...त्यामुळे मी आयुष्यभर सायकल चालवणार
एका हाताने सायकल चालविताना कोणतीही अडचण येत नाही, कारण मला त्याची सवय झाली आहे. मी पहिल्यांदा सायकलवर मनाली ते खारदुंगला हा प्रवास पूर्ण केला आहे. माझे दिव्यांगत्व कधीच माझ्या आड आले नाही. सायकलमुळे शारीरिक, मानसिक फिटनेसही कायम राहतो. त्यामुळे मी आयुष्यभर सायकल चालवत राहीन. - रचित कुलश्रेष्ठ, दिव्यांग सायकलपटू