पुणे : आई नुकतीच अस्थमातून बरी झाली हाेती. आग्रह करून तिने पहिल्यांदाच माउलींच्या पालखी साेहळ्यात सहभाग घेतला. जेजुरी ते वाल्हे दरम्यान गावातील दिंडीची आणि तिची चुकामूक झाली. सलग तीन दिवस शाेध घेऊनही ती मिळून आली नाही. त्यामुळे सर्वच चिंताक्रांत झाले हाेते. मंगळवारी सकाळी तरडगाव रस्त्यावर एका दिंडीत अखेर तिची भेट झाली आणि भावंडांना अश्रू अनावर झाले.
अरुणा शिवाजीराव बरकुले (वय ६२, रा. खांडवी, ता. परतूर, जि. जालना) असे या वारकरी आजीचे नाव आहे. मुले नाेकरी-व्यवसायाला लागल्याने आपले संसारिक कर्तव्य पार पडल्याचे सांगत त्या यंदा गावातील दिंडीतून संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी साेहळ्यात सहभागी झाल्या हाेत्या. आळंदी ते जेजुरी असा प्रवास झाल्यानंतर शनिवारी पाय दुखत असल्याने त्या मागे पडल्या. दिंडी वाल्हे येथे मुक्कामी थांबणार हाेती. त्यामुळे मुक्कामाच्या ठिकाणावर जाण्यासाठी वाहनाची मदत घेत पुढे निघाल्या. वाहनचालकाने त्यांना वाल्हे येथून काही अंतर पुढे साेडले. तेथे उभा राहून त्यांनी दिंडीची बराच वेळ वाट पाहिली मात्र, गावातील माणसे दिसली नाहीत. अखेर अंधार पडल्याने तेथून जात असलेल्या नांदेड जिल्ह्यातील भाेकर येथील प्रकाश महाराज यांना विनंती करीत त्या दिंडीत सहभागी झाल्या. दुसरीकडे वाल्हे येथे राहुट्यांमध्ये त्या मुक्कामी परतल्या नसल्याने दाेन मुलांसह नातेवाईक वाल्हे येथे आले आणि सगळ्यांनी त्यांचा शाेध घेण्यास सुरुवात केली.
नातेवाइकांनी पाेलिसांत तक्रार दिली. तसेच गावाहून काही विद्यार्थ्यांनाही बाेलाविले हाेते. वारीत सहभागी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आई चुकली असल्याचे मेसेजही पाठविले हाेते. तीन दिवस उलटूनही आईचा शाेध लागत नसल्याने सर्वच चिंतित हाेताे. मंगळवारी सकाळी ७ वाजता मला फाेन आला. तुमची आई सुखरूप असून, आमच्या दिंडीत आहेत, असे सांगितले. आमचा त्यावर विश्वासच बसत नव्हता. सर्वांनी तत्परतेने लाेणंद-तरडगाव रस्त्यावर धाव घेतली. प्रत्यक्षात आई समाेर दिसताच आम्हा सर्वांचा अश्रूचा बांध फुटला.
आई साेबत नसल्याची जाणीवच खूप वेदनादायी असल्याचे उमगले. अनेकांनी तुमची आई दिसल्याचे फाेन करून सांगत आणि आमची धावाधाव हाेई. हाती मात्र निराशा येत हाेती. अखेर मंगळवारी सकाळी काॅल आला आई आम्हाला भेटली.
- प्रा. राम बरकुले, मुलगा