लोकमत न्यूज नेटवर्क
मार्गासनी: वेल्हे तालुक्यातील किल्ले राजगडवरील निवासस्थान व किल्ले तोरणा गडावरील अंबरखान्याचे छत उडाले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली, तर कादवे येथील आदिवासी कुटुंबांच्या घरांची छपरे उडाली आहेत, नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणी नुकसान झाले, कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी दिली.
किल्ले राजगड येथील निवासस्थान पद्मावती माचीवर असून, नुकतेच या निवासस्थानाची डागडुजी करण्यात आली होती. तोरणा किल्ल्यावर देखील अंबरखान्याची देखील डागडुजी करण्यात आली होती. चक्रीवादळामुळे या दोन्ही किल्ल्यावरील इमारतींचे नुकसान झाले असून छत उडाले आहे. आडवली येथील एका घराचे पत्रे उडाले असून एका खासगी व्यक्तीचे पॉलिहाऊस देखील उडाले आहे. पानशेत परिसरात कादव येथील आदिवासी वस्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बारा घरांची येथे पडझड झालेली आहे. तहसीलदार शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी या वस्तीस भेट दिली. नुकसानीचा पंचनामा केला असून लवकरच त्यांना भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी दिली.
फोटो : ओळ राजगड(ता.वेल्हे)येथील निवासस्थानाचे उडालेले पत्रे.