लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : १० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने औंध येथील एका व्यावसायिकाला ९५ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी औंध येथील ५१ वर्षांच्या व्यावसायिकाने लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी विवेक भाटीया, आर. के. ऊर्फ रवीकुमार मोहम्मद समीर, सात्विक चंद्रशेखर, विनोद नरसिंमन (रा. चेन्नई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ऑक्टोबर २०२० ते १३ ऑगस्ट २०२१ दरम्यान घडली आहे.
फिर्यादी व त्यांचे मित्र विनोद पाटील यांना आरोपींनी १० कोटी कर्ज रक्कम देतो असे सांगून दोघांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दोघांकडून कर्ज प्रकरण करण्यासाठी कमिशन व सहा महिन्याचे व्याज प्रथम द्यावे लागेल असे सांगून वेळोवेळी ९५ लाख रुपये विविध बँक खात्यात कर्ज देण्याच्या बहाण्याने घेतले. त्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचे कर्ज व दिलेली रक्कम परत न करता आर्थिक फसवणूक केली. पोलिस उपनिरीक्षक गोरे तपास करीत आहेत.