पिंपरी: पंतप्रधान आवास योजनेची सोडत प्रशासनाने अचानक रद्द केल्याने महापौर उषा ढोरे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या मांडला. दरम्यान, आयुक्त, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाजपने घोषणाबाजी केली.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सोमवारी दुपारी तीन वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोडत काढली जाणार होती. त्यासाठी दुपारपासून नागरिक जमा झाले होते. महापौर उषा ढोरे, भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. अचानक सोडत रद्द करण्यात आली. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे.
राष्ट्रवादीपुढे झुकणाऱ्या आयुक्तांचा धिक्कार असो अशा जोरदार घोषणा दिल्या. महापौरांचा अपमान झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. कोणाच्या सांगण्यावरून कार्यक्रम रद्द केल्याचे जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.
...........आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले..आवास योजनेसाठी केंद्र, राज्य सरकार यांचा निधी आहे त्यामळे याबाबत राजशिष्टाचाराचे पालन करणे आवश्यक आहे. याबाबत माझ्याकडे कार्यक्रम फाईल आल्यानंतर राजशिष्टाचार पालन न झाल्याचे लक्षात आले. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत सोडत व्हावी यासाठी आम्ही आग्रही होतो. राजशिष्टाचाराचे पालन झाले नाही. त्यामुळे सोडत रद्द केली आहे."