पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आताच आगमन झाले. त्यांच्या विरोधात मंडईमध्ये जोरदार नारा देण्यात आला. कोण आला रे कोण आला, चोर आला चोर आला चा नारा देण्यात आला.
पंतप्रधान मोदी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उध्दव ठाकरे गट), रिपब्लिकन व डाव्या तसेच आंबेडकरवादी, पुरोगामी पक्ष संघटना यांच्या वतीने त्यांचा निषेध आंदोलन करण्यात येत आहे. सकाळी ९.०० वाजल्यापासून मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळा येथे नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवून नरेंद्र मोदी चले जावच्या घोषणा देण्यात येत आहेत.
मणिपूर येथील हिंसाचार व महिला अत्याचाराच्या घटनांकडे होत असलेले दुर्लक्ष तसेच संसदेला सामोरे न जाता विरोधकांचा केला जाणारा अनादर यासह केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ हे आंदोलन झाले. आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव, गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी, पुणे शहर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रशांत जगताप, शिवसेना (उध्दव ठाकरे गट) चे सुषमा अंधारे, संजय मोरे व गजानन थरकुटे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, डाव्या चळवळीचे अजित अभ्यंकर, नितीन पवार, सुभाष वारे, डॉ. अभिजीत वैद्य, विश्वंभर चौधरी, शरद जावडेकर, लुकस केदारी इ. सह संबंधित पक्षांच्या प्रमुख मान्यवरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. निषेध सभा घेऊन मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.