पूजा ढमाळ म्हणाली, लहानपणापासूनच खेळाची आवड होती. त्यामुळे चौथीपासूनच खेळाला सुरुवात केली. खेळाच्या करिअरला सुरुवात ८वीपासून झाली. त्याच वेळी ८वीमध्ये कांदोली येथे माझी सब-जुनिअर हॅण्डबॉल खेळाची पहिली स्पर्धा झाली. त्यामध्ये महाराष्ट्राची कॅप्टनशिप मिळाली.ती खरी माझ्या करिअरची सुरुवात म्हणता येईल. त्यानंतर स्कूल नॅशनल, स्टेट नॅशनल, जुनिअर नॅशनल, फेडरेशन अशा वेगवेगळ्या स्पर्धेत खेळले. सन २०१०मध्ये स्वीडन येथे झालेल्या स्पर्धेमध्ये मी सहभाग घेतला. यानंतर २०११मध्ये झारखंडमध्ये झालेल्या नॅशनल स्पर्धेत रौप्यपदक मिळाले. २०१४मध्ये इंदूरला झालेल्या जुनिअर नॅशनल स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, त्यामध्ये कांस्यपदक मिळाले व महाराष्ट्राची कर्णधार म्हणून निवड झाली. २०१५मध्ये केरळ येथे झालेल्या नॅशनल स्पर्धेत कांस्यपदक मिळाले. दरवर्षी मी ३ ते ४ नॅशनल स्पर्धांत सहभाग घेतला. २०१७मध्ये छत्तीसगड येथे झालेल्या स्पर्धेत सहभाग घेतला.यावर्षी नुकत्याच चेन्नईमध्ये झालेल्या सिनिअर नॅशनल स्पर्धेत सहभाग घेतला. अनेक स्पर्धा खेळले आणि त्यामध्ये अनेक विजेतेपद मिळविले. खेळामध्ये मला आई-वडील तसेच राजेंद्र राऊत, रूपेश मोरे, तानाजी देशमुख, राहुल चव्हाण, राजेश गारडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी खेळासाठी खूप मदत केली. त्यांच्यामुळेच यश मिळाले.खेळासाठी खूप सराव करते. तसेच व्यायाम पण करते. ‘हँडबॉल’ नावात म्हटल्याप्रमाणे बॉल हातात घेऊन खेळायचा हा खेळ आहे. इनडोअर बॉलगेम्समधे याचे कोर्ट सगळ्यात मोठे असते. यातही फुटबॉलप्रमाणे दोन गोल असतात व गोलकीपर्स त्याचे रक्षण करत असतात. गोलकीपर्सच केवळ गोलभोवती थांबू शकतो. तर विरुद्ध संघाचे खेळाडू हाताने (तुलनेने) लहान बॉल फेकून गोल करतात. गोल करताना जाळ्याजवळ असल्यास खेळाडूला हातातला बॉल पाय टेकायच्या आत जाळ्यात भिरकावावा लागतो.बॉल ड्रिबल करणे अथवा पास करणे अपेक्षित असते. (अमेरिकन फुटबॉलप्रमाणे) बॉल घेऊन पळण्यास प्रतिबंध असतो. हाताने खेळल्यावर अर्थातच बरेच जास्त गोल होतात. दर मॅचमध्ये साधारण ५०हून अधिक गोल होतात. उत्साहाने भरलेल्या या मॅचेस ३० मिनिटांच्या दोन सत्रात खेळल्या जातात. यासाठी मेहनतही खूप लागते. तसेच शेवटपर्यंत आपल्या अंगामध्ये ऊर्जा असणे गरजेचे असते. विविध क्षेत्रांबरोबरच क्रीडाक्षेत्रातही आज मुलींनी प्रगती केलेली दिसते. खेळामध्ये चांगले काम एखादा क्रीडाप्रेमीच करू शकतो.मुलींना या क्रीडाक्षेत्रामध्ये आणण्यासाठी आधी पालकांना समजावून त्यांचा विश्वास संपादन करण्याची गरज आहे. अनेक पालक मुला-मुलींमध्ये भेद करताना दिसतात. मुलींना ठराविक खेळापुरते मर्यादित ठेवले जाते. अनेक मुली गुणवत्ता असूनही क्रीडा प्रशिक्षण संस्थांचे मार्गदर्शन न मिळाल्याने खेळापासून दुरावतात. खेळासाठी मुलींची शारीरिक क्षमताही चांगली असते. तसेच मैदानी खेळासाठी लागणारे गुण मुलींमध्ये उपजतच असतात. खेळावर मुलांइतकाच मुलींचाही हक्क असताना अनेक क्रीडा शिक्षकांमार्फत मुलींची जबाबदारी टाळण्यासाठी त्यांना ठराविक स्तरापुरतेच मर्यादित ठेवले जाते. बहुतांशवेळा पालकही शहराबाहेर मुलींना खेळण्यास जाऊ देत नाहीत. त्यामुळे मुलींच्या अंगी असलेल्या गुणांना वाव मिळत नाही. म्हणून खेळ मुलींसाठी शाळेपुरताच मर्यादित राहतो. पालकांनी असे न करता त्यांचे प्रोत्साहन मिळाले तर मुलींना आपल्या अंगी असलेल्या स्वत:च्या गुणांची क्षमता ओळखण्यात मदत होईल, असे पूजाने सांगितले.
खेळाच्या प्रेमातून यशाच्या शिखरावर - पूजा ढमाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 2:38 AM