पण परिस्थिती अशी बिकट की कोरोनाचे संकट अजूनही घोंगावते आहे. ऑलिम्पिक जिथे खेळली जाणार त्या जपानमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू आले आहेत. त्यांच्यासोबत कोरोनाचा विषाणू आलेलाच नसेल असे सांगता येत नाही. ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये कोरोना रुग्ण आढळूनही आले आहेत. तरीही आजवरच्या इतिहासात सर्वात महागडी ठरलेली ही ऑलिम्पिक स्पर्धा पार पाडण्यासाठी जपानने कंबर कसली आहे. ही स्पर्धा प्रेक्षकांविना रंगणार असली तरी दूरचित्रवाणीच्या, इंटरनेटच्या माध्यमातून जगभरचे प्रेक्षक स्पर्धेला लाभतील. खरे तर ऑलिम्पिकमधल्या यशाचा इतिहास भारतासाठी फार भरजरी नाही. म्हणून तर अजूनही आपल्याला खाशबा जाधव यांनी पन्नाशीच्या दशकात मिळवलेल्या पहिल्या पदकापासून ते अलिकडच्या अभिनव बिंद्राच्या एकमेव ‘ऑलिम्पिक गोल्ड’पर्यंतच्या मोजक्याच आठवणी जपून ठेवाव्या लागतात. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच भारताची पदक संख्या दुहेरी आकड्यात पोहोचेल असा विश्वास क्रीडा क्षेत्राला आहे. जगभरातून तब्बल साडेअकरा हजार खेळाडू विविध क्रीडा स्पर्धांमध्ये स्वतःची ताकद दाखवणार आहेत. सुवर्ण, रजत आणि कांस्यपदक गळ्यात मिरवण्याचा आनंद क्षणिक असेल पण ‘जगात सर्वोत्कृष्ट’ ठरण्याची ऊर्मी त्या खेळाडूला, त्याच्या देशाला दीर्घकाळ अभिमानास्पद वाटत राहील. त्यासाठी झुंजणाऱ्या साडेअकरा हजारांमध्ये १२७ भारतीय आहेत. त्यातही पाहावे तर देशाच्या एकूण लोकसंख्येत प्रत्येकी फक्त सव्वादोन टक्के वाटा असलेल्या हरयाणा, पंजाब या राज्यातले अनुक्रमे ३१ आणि १९ खेळाडू ऑलिम्पिक खेळतील. देशाची ९ टक्के लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राचे सहाच खेळाडू ऑलिम्पिकमध्ये आहेत. हे चित्र कधी बदलणार कोण जाणे? तूर्त तिरंगा खांद्यावर घेऊन झुंजणाऱ्या प्रत्येक भारतीयासोबत आपणही जपानच्या मैदानात उतरुयात. पदकांचे प्रेम जिंकण्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊयात. सध्याच्या कठीण काळात ऑलिम्पिकपर्यंत ही सगळी मंडळी झेपावली हेही थोडके नाही.
‘लव्ह इन टोकियो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 4:08 AM