पुणे : विविध मार्गावर सुरू केलेल्या विनावाहक - विनाथांबा या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एस. टी.) चालक कम वाहक मिळत नाहीत. राज्यातील बहुतेक सर्वच विभागांत दोन्ही परवाने असलेले चालक मिळण्यात अडचणी येत आहेत. पुणे विभागात आतापर्यंत एकही चालक कम वाहकाची भरती झालेली नाही. प्रवाशांचा वेळ वाचून त्यांना अधिक वेगवान सेवा मिळावी यासाठी एस. टी. महामंडळाने राज्यात अनेक मार्गांवर विनावाहक-विनाथांबा बससेवा सुरू केली आहे. या सेवेसाठी प्रवाशांना ज्या ठिकाणाहून बस सुटणार आहे, तिथेच तिकीट घेणे आवश्यक असते. तिथून बस गेल्यानंतर पुढे ती कुठेही न थांबता थेट शेवटच्या स्थानकापर्यंत जाते. काही मार्गांवर एक-दोन प्रमुख ठिकाणी बस थांबविल्या जातात. या प्रवासादरम्यान एस. टी.ची सर्व जबाबदारी चालकाच्या खांद्यावर असते. तसेच मिनी बसेससाठीही चालक कम वाहकाची गरज भासते. चालकच वाहकाप्रमाणे तिकीट काढतो. त्यामुळे एस. टी.ची एका कर्मचाऱ्याची गरज कमी होते. या दोन्ही बसेससाठी महामंडळाने यापूर्वी जाहिराती दिल्या होत्या. मात्र, त्याला खूपच कमी प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)४राज्यात पुणे विभागात एकही चालक कम वाहक नसल्याची माहिती विभागीय व्यवस्थापक शैलेश चव्हाण यांनी दिली. ते म्हणाले, की यापूर्वी चालक कम वाहक पदासाठी दोन-तीन वेळा जाहिरात देण्यात आली होती. मात्र, पुणे विभागात एकही भरती झालेली नाही. चालक व वाहक असे दोन्ही परवाने असलेले चालक मिळत नाहीत. त्यामुळे अडचणी येतात. मिनी बससाठी याचा खूप फायदा होऊ शकतो. सध्या चालक कम वाहक असे परवाने अनेकांनी घेतले आहेत. त्यामुळे एस. टी. महामंडळाने दिलेल्या जाहिरातीला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.
एसटीला मिळेनात चालक कम वाहक
By admin | Published: February 21, 2015 1:56 AM