राजू इनामदार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : समाजवादी विचारांच्या पूर्ण वेळ कार्यकर्त्यांना आर्थिक मदत देणाऱ्या सामाजिक कृतज्ञता निधीसमोर आता कमी व्याजदराची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे मदत देण्यात येणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या व मदतही कमी करावी लागली आहे. डॉ. आढाव यांनी निधीवरचा व्याजदर कमी होत चालल्याबद्दल नुकतीच जाहीरपणे खंत व्यक्त केली.
राष्ट्रीयीकृत बँकेत विश्वस्त निधीची १ कोटी ५१ लाख रुपयांची कायम ठेव आहे. नव्वदच्या दशकात व्याजदर चांगला असल्याने वार्षिक ११ लाख रूपये व्याज मिळत होते. त्यातून ५० कार्यकर्त्यांना दरमहा ५ ते १० हजार रूपयांपर्यंत मदत होत होती. नव्या आर्थिक धोरणामुळे बँकांचे व्याजदर कमी झाल्याने सध्या वार्षिक ७ लाख रूपये मिळतात. त्यातून ३५ कार्यकर्त्यांना व दरमहा २ ते ३ हजार रूपये मदत करता येते. व्याज दर आणखी कमी झाले तर यात आणखी कपात करावी लागण्याची चिंता विश्वस्तांना आहे.
राज्याच्या वेगवेगळ्या भागातील कागद, काच, पत्रा कामगारांपासून ते बंदरांवरच्या मच्छीमारांपर्यंत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ही मदत दिली जाते. या कार्यकर्त्यांसाठी ही मदत एक सन्मान आहेच, शिवाय त्यातून त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदतही होते. मदत नसल्याने त्यांच्या कामावर परिणाम झालेला नाही, मात्र निधीचे उद्दिष्ट साध्य होत नसल्याने विश्वस्त मंडळ चिंतित आहे.
डॉॅ. श्रीराम लागू, निळू फुले, डॉ. बाबा आढाव, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या प्रयत्नांतून हा निधी साकार झाला. डॉ. लागू यांनी नामवंत कलाकारांचे साह्य घेत ‘लग्नाची बेडी’ या नाट्यप्रयोगाचा महाराष्ट्रभर दौरा केला. त्यातून जमा झालेले पैसे खर्च वजा जाता बँकेत ठेवण्यात आले. त्याचा ट्रस्ट तयार करण्यात आला. विश्वस्त मंडळामार्फत हे कामकाज होते. त्यावर डॉ. आढाव यांच्यासह अविनाश पाटील, युवराज मोहिते, विजय दिवाण हे विश्वस्त आहेत. गजानन खातू अध्यक्ष, सुभाष वारे कार्याध्यक्ष, अॅड. जाकीर अत्तार कार्यवाह, पौर्णिमा चिकरमाने कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतात.