लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पूर्व उत्तर प्रदेश व बिहारलगतचा भाग ते पूर्व विदर्भ दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४३.४ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे २० अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
अमरावती जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात गुरुवारी दुपारी अचानक वादळी पाऊस झाला. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान होते. त्यामुळे मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी दिवसाच्या तापमानात घट झाल्याचे दिसून आले.
राज्यात शुक्रवारी ९ एप्रिलपासून १२ एप्रिलपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनसह पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात तसेच नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यात ९ ते १२ एप्रिल दरम्यान हलका ते मध्यम स्वरुपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे.
ऑरेंज अलर्ट
चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात १० व ११ एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी,हिंगोली, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात १० ते १२ एप्रिल दरम्यान वादळी वार्यांसह पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्यात ११ व १२ एप्रिल रोजी पावसाची शक्यता आहे.
पुण्यात ढगाळ हवामान
पुणे शहर व परिसरात गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ हवामान होते. त्यामुळे कमाल तापमानात मोठी घट नोंदविली गेली आहे. बुधवारी कमाल तापमान ३९.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. त्यात आज ५ अंशांची घट होऊन गुरुवारी कमाल तापमान ३४़२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. शहरात पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. ११ व १२ एप्रिल रोजी आकाश ढगाळ राहुन दुपारनंतर मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे.