लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नैर्ऋत्य मध्य प्रदेश ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत विदर्भ, तेलंगणा, रायलसिमामार्गे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. विदर्भ व लगतच्या मराठवाड्यावर चक्रीय चक्रवात तयार झाले आहे. त्यामुळे पुढील ४ दिवस संपूर्ण विदर्भ व लगतच्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात मंगळवारी सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४२.८ अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १८.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
विदर्भात सध्या देशातील सर्वाधिक कमाल तापमान नोंदविले जात आहे. सोमवारी ब्रम्हपुरी येथे ४३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. ते देशातील सर्वाधिक कमाल तापमान ठरले आहे.
मध्य प्रदेश व लगतच्या भागापासून उत्तर कर्नाटकापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. ते मंगळवारी दक्षिण तमिळनाडूपर्यंत गेले आहे. त्यामुळे पुढील चार दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात २४ एप्रिल रोजी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पुणे शहरात सध्या उन्हाचा कडाका कमी झाला असला तरी रात्रीच्या तापमानात वाढ झाली आहे़. पुण्यात मंगळवारी ३७.३ आणि २०.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
पुणे शहर व परिसरात आकाश मुख्यत: निरभ्र राहून दुपारनंतर अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.