पुणे: पुण्यातील गणेशोत्सवामधील साउंड सिस्टिमच्या भिंती आणि ढोल पथकांमधील ढोलांची संख्या ५० पेक्षा जास्त असता कामा नये. ढोल कमी असले, तरी योग्य वादन केल्यानंतर आवाज चांगला येतो. डिजे आणि लेझर लाइटचा तरुण पिढीच्या अवयवांवर परिणाम होत आहे, याकडे ह्रदयविकार तज्ज्ञ डॉक्टर, स्वंयसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी लक्ष वेधले. त्यावर गणेश मंडळांनाही सामाजिक भान आहे. वेळप्रसंगी कार्यकर्ते रस्त्यावर उतरून प्रशासनाला मदत करतात. गणेश मंडळांचे चांगले कार्य पाहायला हवे, केवळ टीका नको, अशी भूमिका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मांडली.
पुणे महापालिकेने गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी वैघकीय क्षेत्रातील डॉक्टर, पर्यावरण तज्ज्ञ उपस्थित होते. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., पोलिस उपायुक्त हिंमत जाधव, विशेष शाखेचे उपायुक्त संदीपसिंह गिल, पालिकचे उपायुक्त माधव जगताप, महेश पाटील, आशा राऊत, चेतना केरूरे आदी उपस्थित होते.
ढोल ताशा पथकांचा सराव दोन महिन्यांपासून सुरू आहेत. याबाबत तक्रार करूनही काहीच दखल घेतली जात नाही. किती दिवस आधी सराव सुरू करावा, हे निश्चित करावे. उत्सवामध्ये रुग्णवाहिकांना रस्ता मिळत नाही. रुग्णवाहिकेला सायरन असतो, मात्र उपचारासाठी जाणारे डॉक्टर, नर्स यांना पोहचता येत नाही. रुग्ण पोहचतो, पण त्यावर उपचार देणारे पोहचत नाहीत. उत्सवानंतर ह्रदयरोगाचे रुग्ण वाढतात, याकडे वैघकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांनी लक्ष वेधले.
संभाजी उद्यानाच्या समोरील मेट्रोच्या पादचारी पुलाची उंची कमी म्हणजे १७ फुटांची आहे. त्यामुळे शिवाजीनगर भागातील आणि जंगली महाराज रस्त्यांवरील गणपती मंडळाची अडचण होणार आहे. त्यामुळे शिवाजी नगरच्या मंडळांना फर्ग्युसन रस्त्यावरून जाण्याची परवानगी द्यावी. गणेशोत्सवात काही तरी चांगले आहे, म्हणूनच पदेशातून आणि देशातून लोक शहरात येतात. ध्वनी प्रदूषणाला व स्पिकरच्या भिंती लावायला आमचाही विरोध आहे. डिजे केवळ गणपतीमध्ये वाजतात, असे नाही, तर वर्षभर इतर वेळीही वाजतात. पोलिसांनी त्यावर ठोस कार्यवाही करावी. गणपती मंडळांच्या ८५ टक्के कार्यकर्त्यांचा स्पिकरच्या भिंतींना विरोध आहे. गणेश मूर्ती विक्रेत्यांना ३१ ऑगस्टपर्यंत परवानग्या द्याव्यात, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. रवींद्र माळवदकर म्हणाले, आयुक्तांनी गणेश मंडळाची एक महिना आगोदर बैठक घेतली आहे. यामध्ये वाद नाही, तर संवाद होत आहे. त्रुटी दूर करण्यासाठी वर्षभर आधीच तयारी केली पाहिजे. राज्य सरकारनेच डिजेच्या निर्मितीवर बंदी घालावी.
त्यावर आयुक्त डॉ. राजेद्र भोसले म्हणाले, ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीत गणेश मंडळांनी नियम पाळावेत. ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीसाठी नंबर जाहीर केला जाईल. उत्सव साजरा करताना दुष्परिणामांची जाण आसायला हवी. मंडळाचे कार्यकर्ते नियम पाळतील. मंडळाच्या उत्पन्नासाठी, जाहिरातीसाठी धोरण तयार केले जाईल. पूर्वीचे सर्व निर्णय कायम राहतील. कमानीमुळे रस्त्याची रुंदी कमी होणार नाही, याची काळजी घ्यावी. स्वच्छतागृहांची स्वच्छता सातत्याने केली जाईल. फूटपाथ व रस्त्यावर अतिक्रमणे काढली जातील. मेट्रोला योग्य सूचना केल्या जातील. कार्यकर्त्यांनी अतिउत्साह कमी करणे गरजेचे आहे. ढोल ताशाच्या सरावासाठी नो-रेसिडन्स झोन शोधावा. मूर्ती विक्री परवानगी लवकर दिली जाईल, असे आयुक्त भोसले यांनी सांगितले.