पुण्यातील लोकसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेस निष्ठावंतांवर येणार संक्रांत..?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 07:06 PM2019-02-22T19:06:45+5:302019-02-22T19:14:47+5:30
पुण्यातून इच्छूक असलेल्या कोणालाही उमेदवारी देण्यास पक्षाचे नेतेच नाखूश असल्याचा सूर या बैठकीत आळवला गेला..
पुणे: पुण्यातून इच्छूक असलेल्या कोणालाही उमेदवारी देण्यास पक्षाचे नेतेच नाखूश आहे. कारण काँग्रेसमध्ये लोकसभेच्या उमेदवारीवारीवरुन प्रचंड मतभेद, गटबाजी आहे. परंतु, पक्षाला त्याचा काडीमात्र उपयोग नाही. तसेच लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या यादीत अचानक इतकी नावे येतात वाढतात कशी? फार्म भरला त्यांची नावे यादीत घेतली, आता फार्म भरला नाही ते पण इच्छुक कसे झाले असा प्रश्न उपस्थित करुन नाव न घेता माजी आमदार ऊल्हास पवार यांच्यावर देखील टीका केली. तुमच्यात एकमत झाले नाहीतर अशा परिस्थितीत उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. त्यांच्याकडून ज्या कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल तो सर्वांना मान्य करावा लागेल, अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस इच्छुक उमेदवारांचे कान टोचले आले.
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या आदेशावरून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (दि.२२) सकाळी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला पाटील यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण निरीक्षक म्हणून उपस्थित होते. या बैठकीला आमदार विश्वजीत कदम, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, अभय छाजेड, अरविंद शिंदे या इच्छुकांसह गांधी यांना पत्र पाठवणारे माजी आमदार ऊल्हास पवार, प्रदेश कार्यकारिणीचे संजय बालगूडे, आबा बागूल, कमल व्यवहारे, नीता रजपूत, गोपाळ तिवारी, आदी उपस्थित होते.
सुरूवातीला सर्वांबरोबर एकत्रित संवाद करण्यात आला. त्यात तूम्ही इथे तूमचे एकमत केले पाहिजे, सीट जिंकणे सोपे नाही, पण एकत्र राहणे गरजेचे आहे. तसे दिसत नाही.त्यानंतर दोन्ही नेत्यांनी वैयक्तिकपणे प्रत्येकाशी चर्चा केली. यात मराठा उमेदवार दिला तर काय, अन्य उमेदवार दिला तर काय, तूमची पसंती कोणाला, स्थानिक उमेदवार चालेल का, सध्याची स्थिती काय आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. त्यातही एकमत होत नसेल तर पक्षश्रेष्ठी देतील तो उमेदवार मान्य करावा लागेल असेच सांगण्यात आले .पुण्यातून इच्छूक असलेल्या कोणालाही उमेदवारी देण्यास पक्षाचे नेतेच नाखूश असल्याचा सूर या बैठकीत आळवला गेला. बैठकीत सहभागी झालेल्या इच्छुक उमेदवारांचा कानोसा घेतला असता हे चित्र पाहायला मिळाले. तुमच्यात एकमत होत नाही तर पक्षश्रेष्ठी देतील त्या उमेदवाराचे काम करावे लागेल असे नेत्यांनी वैयक्तिक व सामूहिक रित्याही बजावले असल्याचे समजते.
...............
काहीजणांकडून माहिती घेतली असता बहुतेकजण बैठकीवर नाराज असल्याचे दिसले. शहर शाखेने पाच नावे पाठवली, त्यातील तीन नावे प्रदेशने फायनल केली, आता ती केंद्रीय समितीकडे पाठवण्याचे सोडून ही बैठक कशासाठी घेतली तेच समजत नाही असेच त्यांचे म्हणणे आहे. उमेदवार आयात करण्याचे पक्के झाले आहे. स्थानिकांची मानसिकता तयार करण्यासाठीच ही बैठक घेतली गेली. आता एकतर जातीय विचारांची पार्श्वभूमी असलेल्यांचा किंवा मग पैसेवाल्यांचा प्रचार करावा लागणार असा त्रागाही काहींनी व्यक्त केला.
---
आमदार अनंत गाडगीळ यांच्या वतीने एका शिष्टमंडळाने पाटील व चव्हाण यांची भेट घेतली व त्यांना उमेदवारी देणे पक्षासाठी कसे उपयोगी आहे ते सांगितले असल्याची माहिती मिळाली. गाडगीळ बैठकीला आलेच नाहीत. मात्र, ते लोकसभेसाठी इच्छुक असून आमदार म्हणून काय कामे केली याचे बोर्ड त्यांनी पुण्यातील काही चौकांमध्ये लावले आहेत.