बाबासाहेबांच्या तब्येतील गेली दहा वर्षे चढ-उतार होत आहेत. वयोमानानुसार शरीराच्या तक्रारी उदभवतातच. मात्र, नैराश्य आणि नकारात्मकतेचा त्यांच्या मनाला स्पर्शही होत नाही. बाबासाहेब कायम आनंदी असतात. ते मुलांकडे राहत नाहीत. बहुतेक वेळा ते स्वतंत्र राहतात, आपल्या कामात गुंतलेले असतात. परावलंबी जीवन न जगणे ही वयाच्या ९९ व्या वर्षी अशक्यप्राय गोष्ट आहे आणि ती बाबासाहेबांनी शक्य करुन दाखवले आहे. मी लस देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांना लस द्यावी की नाही, याबाबत मीच साशंक होतो. ते मात्र निर्धास्त होते. मी त्यांना विचारले की, ‘बाबासाहेब लस द्यायची ना नक्की?’...ते म्हणाले, ‘अर्थात! मला अजून खूप जगायचे आहे.’ सध्या काय करताय असे विचारले असता ते म्हणाले की, मी शिवचरित्राची नवी आवृत्ती करत आहे. गेल्या २०-२५ वर्षांमध्ये नवीन पुरावे हाती आले आहेत, ते समाविष्ट करुन आजच्या काळाशी सुसंगत लिखाण करत आहे.’
बाबासाहेब म्हणाले, ‘मला हॉस्पिटलसाठी १ कोटी रुपये द्यायचे आहेत आणि ते मी माझ्या पध्दतीने देणार आहे.’ त्यानुसार, त्यांनी ५ लाख रुपयांचा धनादेश हॉस्पिटलसाठी दिलाही! वयाच्या ९९ व्या वर्षी एखादी व्यक्ती दानाची भाषा करु शकतो, हेच थक्क करणारे आहे. आयुष्याकडे ते अत्यंत सकारात्मकतेने पाहतात. आरोग्याच्या तक्रारींवरही ते आपल्या कामातून मात करतात. त्यांची स्मरणशक्ती अगाध आहे. त्यांच्या प्रत्येक रहस्याचे मूळ शिवछत्रपतींजवळ जाऊन पोहोचते. आजही शिवरायांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचवण्याचाच ध्यास त्यांनी घेतला आहे. शिस्त, ध्येय, उपयुक्त काम हीच त्यांच्या आयुष्याची गुरुकिल्ली आहे.
- डॉ. धनंजय केळकर, वैद्यकीय संचालक, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल