लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देवळात जाऊन हार, फुले वाहणे म्हणजेच भक्ती असे नाही तर ज्या क्षेत्रात आपण कार्यरत असतो, त्या क्षेत्रात झोकून देऊन केलेले काम आणि कामाप्रती असलेली निष्ठा हीच खरी भक्ती असते, असे प्रतिपादन ‘डॉक्टर्स फॉर बेगर्स' अशी ख्याती असलेले डॉ. अभिजित सोनवणे यांनी केले. मराठवाडा मित्र मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘भिक्षेकरी ते कष्टकरी’ या विषयावर डॉ. सोनवणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मराठवाडा मित्रमंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, कार्यकारिणी सदस्य तेज निवळीकर, प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार व उपप्राचार्य आर. आर. पंडित उपस्थित होते.
डॉ. सोनवणे म्हणाले, चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व यात फरक आहे. कुणीतरी आपल्याकडे पाहतो म्हणून आपण जे चांगले वागतो ते व्यक्तिमत्त्व असते. पण आपल्याकडे कोणी पाहत नसतानाही चांगले वागणे हे चारित्र्य असते, ही गाडगे महाराजांची शिकवण आहे. आपल्याला पाहून एखाद्याला भीती वाटण्यापेक्षा आधार वाटणे फार महत्त्वाचे असते. एखाद्याला पाडायला ताकद लागत नाही, तर उचलायला-आधार द्यायला ताकद आणि अक्कल लागते. समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत आपल्या कार्याच्या माध्यमातून आपण पोहोचले पाहिजे, शिक्षण घेतानाच विद्यार्थ्यांना समाजकार्याचे महत्त्व जाणून घ्यावे, असा संदेश भाऊसाहेब जाधव यांनी दिला.
उपप्राचार्य रमेश पंडित, प्रा. इंदिरा अभंग व प्रा. सुनील पवार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. डॉ. सुजाता शेणई यांनी सूत्रसंचालन, तर प्राचार्य देविदास गोल्हार यांनी आभार मानले.