पुणे: शहरातील निवासी मिळकतींना करात ४० टक्के सवलत देण्याचा निर्णय नुकताच राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार १ एप्रिल, २०१९ च्या पूर्वीच्या व नंतर बांधण्यात आलेल्या सर्व मिळकतींना १५ मेपासून बिले वाटप सुरू करण्यात येणार असून, ३१ मेपर्यंत ही बिले तयार करून जूनपर्यंत ती वाटप करण्यात येणार आहेत.
सन २०२३-२४ चा संपूर्ण मिळकतकर भरणाऱ्या मिळकतधारकांना सर्वसाधारण करात देण्यात येणारी ५ टक्के व १० टक्के सवलत घेण्यासाठीची मुदत यंदाच्या वर्षी ३१ जुलै, २०२३ पर्यंत देण्यात आली आहे. दरम्यान या दोन महिन्यात संपूर्ण मिळकत भरणाऱ्यांमध्ये लकी ड्रॉ काढण्यात येणार असून, यातील विजेत्यांना टू बी एच के प्लॅट, चारचाकी, दुचाकी गाडी आदी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती पुणे महापालिकाआयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे. हा लकी ड्रॉ ३१ जुलै नंतर काढण्यात येणार आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यावर महापालिकेच्या तिजोरीत पहिल्या दोन महिन्यात ५ ते १० टक्के सवलतीचा फायदा घेणाऱ्यांकडून सुमारे ७०० कोटी मिळकत कर जमा होतो. त्यात अधिक वाढ व्हावी त्यासाठी यंदा ही लकी ड्रॉ योजना राबविण्यात येत आहे.