पुणे : शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर जम्बो कोविड सेंटर उभारणीचे काम खासगी कंत्राटदाराला दिले होते. लाईफलाईन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीला ते देण्यात आले होते. याच कंपनीला राज्यातील एकूण आठ ठिकाणी काम देण्यात आले होते. मात्र, या कंपनीने बोगस कागदपत्रे सादर करून पुण्यासह ठाणे, नवी मुंबई आदी विविध ठिकाणी काम मिळविले, असा आरोप भाजपचे प्रवक्ते, माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुण्यात केला आहे.
लाईफलाईन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीला जम्बो कोविड सेंटर उभारण्याची कामे कशी मिळाली, कशाच्या आधारावर दिली. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी आणि कागदपत्रांची पाहणी करण्यासाठी किरीट सोमय्या यांनी औंध येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या कार्यालयाला भेट दिली. सोमय्या यांना आयुक्त सुहास दिवसे यांनी माहिती दिली. त्यानंतर सोमय्या पत्रकारांशी बोलत होते.
लाईफलाईन नावाची कंपनीच अस्तित्वात नाहीत. त्यामुळे याविषयी फौजदारी तक्रार दाखल करणार आहे. कारण अनेक कंपन्यांमध्ये भागीदार हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उजवा आणि डावा हात आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी यावेळी केला. त्यांचे प्रत्यक्ष नाव घेण्याचे मात्र त्यांनी टाळले. ते म्हणाले, जी कंपनी अस्तित्वातच नव्हती त्या कंपनीला जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट दिले गेले आहे. मी या सगळ्या फाईली तपासल्या आहेत. त्यानंतरच माझी शंका पक्की झाली आहे. हे कोविड केंद्र ज्या पद्धतीने दिले गेले, बेनामी ओनरशीप कोणाची आहे, हे सगळे पुरावे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देणार आहे. याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी देखील करणार आहे.