पुणे: भोवळ येऊन रस्त्यात पडल्याने पादचाऱ्याला वानवडीतील नामवंत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी जाहीर केले. परंतु मृत रुग्णाच्या गळ्यातील ७० हजारांची सोनसाखळी चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रुग्णालयातील वाॅर्डबाॅयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारुती किसन भालेराव (वय ३६, रा. आझादनगर, वानवडी) असे या वॉर्डबॉयचे नाव आहे. याबाबत दीपक चंदू परदेशी (वय ६०, रा. वैदुवाडी, हडपसर) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दीपक यांचे भाऊ आकाश परदेशी वानवडीतील जगतापनगर परिसरातून २५ मार्च रोजी निघाले होते. रस्त्यात त्यांना भोवळ आल्याने ते पडले. नागरिकांनी त्यांना तातडीने वानवडीतील एका नामवंत खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दीपक रुग्णालयात पोहोचले.
डाॅक्टरांशी त्यांनी चर्चा केली. तेव्हा मृत भाऊ आकाश याच्या गळ्यात सोनसाखळी होती. त्यानंतर रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. तेव्हा आकाश याच्या गळ्यात सोनसाखळी नसल्याचे आढळून आले. अंत्यविधी आटोपल्यानंतर दीपक यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून वाॅर्डबाॅय भालेराव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक संतोष गायकवाड तपास करत आहेत.